Paschim Maharashtra Minister In Mayauti Government : महायुती सरकारमधी मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) नागपुरात पार पाडणार असून यामध्ये 19 मंत्री भाजपकडून मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून 11 जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सात जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मंत्रीपदांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला असून तब्बल 19 चेहरे मंत्रीपदामध्ये नवीन चेहरे असणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे महायुतीमध्ये मंत्रीपदामध्ये भाकरी फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. महायुती सरकारमध्ये मंत्रीपदामध्ये सर्वाधिक मंत्रीपदे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समाजाला जातो तसेच सहकार पंढरी सुद्धा समजली जाते. एकूण 36 जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला असून यामध्ये तब्बल 9 मंत्री पश्चिम महाराष्ट्रातून आहेत. अजित पवार यांच्या रुपाने उपमुख्यमंत्रीपद सुद्धा आहे.
महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप
सहकाराच्या बालेकिल्ल्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जनतेनं मोठी साथ दिली होती. पश्चिम महाराष्ट्रातील 58 पैकी 44 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीमधील दिग्गजांना सुद्धा पराभव पत्करावा लागला. सातारमधून कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा पराभूत झाले. सांगलीमधून विश्वजित कदम यांचा सुद्धा मताधिक्य घटलं होतं. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातून काँग्रेस पूर्णतः हद्दपार झाली आहे. त्यामुळे हे प्राबल्य कायम ठेवण्यासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून मंत्रीपदामध्ये झुकतं माप देण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. सोलापूरला मंत्रीपदात हुलकावणी मिळाली असून सोलापूरमध्ये कोणालाही मंत्रीपदाची संधी देण्यात आलेली नाही.
पश्चिम महाराष्ट्रातून कोणाला संधी?
दुसरीकडे, कोल्हापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांना अपेक्षेप्रमाणे मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर यांना संधी देण्यात आली आहे. सातारमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. शिंदे गटाकडून शंभूराज देसाई यांचे मंत्रीपद कायम आहे. पुण्यामधून चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे, तर माधुरी मिसाळ हा नवीन चेहरा असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंदापूरचे आमदार दत्ता मामा भरणे यांना सुद्धा मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे या मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीचे प्रतिनिधित्व करतात.
पश्चिम महाराष्ट्रातून महाविकास आघाडी हद्दपार
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडासाफ केला असून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काँग्रेस पूर्णत: हद्दपार झाली आहे. सांगली फक्त विश्वजित कदम यांनी विजय मिळवला, पण मताधिक्य घटले आहे. सातारमध्ये कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले. सोलापूरमध्येही काँग्रेसची वाताहत झाली असून शरद पवार गटाने किमान चार जागा जिंकत साथ दिली. पश्चिम महाराष्ट्रात 44 जागा महायुतीने जिंकल्या असून अवघ्या 10 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. 4 ठिकाणी अपक्ष जिंकले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या