Weather Update Today : देशात सध्या विचित्र हवामान पाहायला मिळत आहे. देशात एकीकडे उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे चक्रीवादळाचा कहर (Cyclone) दिसून येत आहे. कुठे मुसळधार पाऊस तर कुठे जोरदार बर्फवृष्टी होत आहे. पश्चिम बंगालला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. तर ईशान्य भारतात ही पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पुढील 24 तासात दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी, पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भाग आणि पश्चिम मध्य भारतामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीमसह जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
पश्चिम बंगालचा चक्रीवादळाचा तडाखा
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे चक्रीवादळ, वादळ, पाऊस आणि गारपिटीमुळे पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर चक्रीवादळामुळे 100 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. चक्रीवादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. याशिवाय कच्चा आणि पक्क्या घरांसोबतच उभ्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितांची भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजही राज्यासह देशात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही काही मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासात काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, आज पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज पावसाची शक्यता आहे. यामध्ये सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, चंद्रपूर या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पाच दिवसांत राज्यात उष्णतेची लाट
पुढील पाच दिवसांत राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आयएमडीकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात काही भागात तापमानात वाढ झाली आहे. या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी सोलापूर येथे 41°C कमाल तापमानाची नोंद झाली. पुणे येथे 20.3 °C हे सर्वात कमी किमान तापमान होते. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात रात्री उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत हवामान कसं असेल?
राज्याती काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार असली, तरी मुंबईत अंगाची लाहीलाही होईल, कारण हवामान खात्याने तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांसाठी तापमानवाढीचा अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहील, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35°C आणि 24°C च्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.