मुंबई : राज्यासह देशाच्या हवामानात (Temperature Rise) गेल्या दोन आठवड्यांपासून मोठा बदल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. हवामान विभागाने (IMD) अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. भरउन्हात दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे मराठवाडा (Marathawada) आणि विदर्भात (Vidarbh) पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता कायम आहे.


पुढील  24 तासात उष्णतेची लाट


पुढील  24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागात उष्णतेची लाट आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि  विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.






मुंबई, ठाणेसह कोकणात उन्हाच्या झळा


कोकणातील तुरळक भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहिल. मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 36 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. 






देशातील हवामान कसं असेल?


नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 2 मे रोजी मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात 2 मे रोजी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. 2 मे रोजी आसाम आणि मेघालयात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 4 मे रोजी गंगेच्या पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, सौराष्ट्र, गुजरात प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 3 मे रोजी पुद्दुचेरी आणि कराईकल आणि अंतर्गत कर्नाटकात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


अवकाळी पावसामुळे शेतकरी रडकुंडीला; आंबा, संत्रा बागेचं नुकसान, विदर्भात कपाशी पिकावर संकट