मुंबई : यंदा दोन दिवस लवकर दाखल झालेल्या मान्सूनचा मुंबईतील जोर कमी झाला आहे. मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे जिह्यात पुढील पाच दिवस पाऊस गायब असणार आहे. या अवधीत तापमानात पुन्हा 34 अंशांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात 21 जूननंतरच पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


मुंबई, ठाण्यात पाऊस पाच दिवस सुट्टीवर


राज्यात ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे, तर काही भागात पावसाने गेल्या काही दिवसांपासू दांडी मारली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना कोसळधारेने भिजवणारा पाऊस आता गायव झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पाऊस पुढील पाच दिवस सुट्टीवर असल्याचं सांगण्यात येत आहे.


21 जूननंतरच जोर वाढणार, तापमानात पुन्हा वाढ होणार


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,  महाराष्ट्रात सध्या कमकुवत मान्सून पाहायला मिळत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, 20 जूननंतर मान्सूनचे वारे अधिक बळकट होण्याची शक्यता असून यानंतर राज्यात मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ताज्या हवामान अपडेटनुसार, येत्या आठवड्यात किमान घाट भागात आणि धरणाच्या पाणलोटांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 ते 20 जूननंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून त्यानंतर 21 जूनपासून महाराष्ट्रात जोरदार मान्सून पाहायला मिळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा


राज्यात एकीकडे पावसाला जोरदार सुरुवात झालेली असली तरी दुसरीकडे मात्र अद्यापही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण केली असून अद्यापही दमदार पावसाला सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे जलस्त्रोत पूर्णतः कोरडे पडल्याने  चारा टंचाईचा देखील सामना पशुपालकांना करावा लागत आहे.


राज्यातील सध्याचं हवामान कसं आहे?


कुडाळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे काही ठिकाणी ओढे पाण्याखाली गेले. तर कुडाळ मालवण रस्तावर मोठं झाड कोसळल्याने एक ते दीड तास हा बंद होता. पिंपळाच भल मोठं या रस्त्यावर कोसळल्याने हा मार्ग बंद झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर भागात मात्र पावसाची रिपरिप सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात आज हवामान अंदाजानुसार जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडात काही भागात जोरदार तर काही भागात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला आहे . जिल्ह्यात पडतअसलेला पाऊस हा पेरणीसाठी योग्य नसला तरी. मात्र, मोठ्या पावसाची प्रतीक्षा बळीराजांना लागली आहे.