ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या निकाालानंतर आता विधानपरिषद (Vidhanparishad) निवडणुकांचे पघडम वाजू लागले आहेत. त्याच, अनुषंगाने आज ठाण्यात महायुतीचा मेळावा पार पडला, यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सुरुवातीलाच सर्वांचे अभिनंदन केले, महायुतीला कोकणात प्रचंड यश मिळाल्याचं त्यांनी म्हटलं. काही लोकांनी गर्जना केली होती की, आम्ही महायुतीला तडीपार करू, पण जनतेनं त्यांनाच कोकणातून तडीपार केले, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. कोकणातील साडे सहा जागांपैकी, साडे सहा यासाठी मावळची थोडी जागा कोकणात येते म्हणून, येथे 5.5 जागा महायुतीच्या निवडून आल्या. केवळ भिवंडीची जागा निवडून येऊ शकली नाही, तिकडे काय घडले ते सर्वांनाच माहीत आहे. जे मुंब्र्यात घडले तेच भिवंडीत घडले, असो ते आपण सुधारू, असे निवडणुकांचं विश्लेषण फडणवीस यांनी लोकसभेतील निकालाचे केले. तसेच, भिंवडीतील (Bhiwandi) पराभवावर अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. 


कोकणाने आपल्याला मोठ्या प्रमाणात यश दिलंय, तुम्हा सर्वांच्या मेहनतीमुळे हे यश आपल्याला मिळालं आहे. आता कोकण पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक आली आहे, पुन्हा एकदा कोकणचा आशीर्वाद महायुतीला मिळणार आहे. मी सर्वात आधी राज ठाकरे यांचे आभार मानतो. कारण, अभिजीत पानसे हे त्यांचे मनसेचे उमेदवार होते, पण आम्ही राज ठाकरे यांना विनंती केली, निरंजन डावखरे आमचे विद्यमान आमदार आहेत. आपण महायुती म्हणून काम करत आहोत, त्यामुळे तुम्ही उमेदवाराला थांबायला सांगावे, त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी निर्णय घेतला आणि पानसे यांनी त्यांची सर्व मेहनत निरंजन यांच्या पाठिशी उभी केली, असे फडणवीस यांनी म्हटले. 


ही निवडणूक प्रचाराची नसून नियोजनाची


निरंजनसारखा तरुण तडफदार आपला उमेदवार आहे, गेल्या 12 वर्षात त्यांनी खूप काम केलं, ज्याप्रमाणे ते आपला संपर्क ठेवतात ते महत्त्वाचे आहे. पदवीधरांचे प्रश्न त्यांनी मांडले, जनसामान्यांचे प्रश्न देखील त्यांनी मांडले, त्यामुळे सभागृहातील जागरुक सदस्य म्हणून त्यांना बघितले जाते. निश्चितपणे एक चांगला उमेदवार महायुतीने दिला आहे, असे म्हणत फडणवीसांनी निरंजन डावखरे यांचे कौतुक केले. ही निवडणूक प्रचाराची नाही, नियोजनाची आहे, रॅली काढायच्या नाहीच, प्रचार करायचा नाही.  ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत, ठाण्यात जास्त जबाबदारी आहे. रायगडमध्ये देखील सर्वाधिक आहेत, तिथे देखील जबाबदारी आहे. पण, निरंजन यांचा चेहरा ओळखीचा आहे, लोकांमधला आहे. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात अनेक मोठे निर्णय आपण घेतले आहेत. पेन्शन बाबत अतिशय चांगला तोडगा मुख्यमंत्र्यांनी काढला, 2005 पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांच्याबाबत देखील चांगला निर्णय सरकारने घेतल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले. 






चारही जागांवर आपले उमेदवार आघाडीवर


विधानपरिषदेची ही निवडणूक एकप्रकारे नवीन नेरेटीव्ह करणारी निवडणूक आहे. कारण, लोकसभेत अनेक खोटे नेरेटीव्ह तयार झाले आहेत. महाविकास आघाडीला .03 टक्के मतं जास्त आहेत, पण त्यांना जास्त जागा आल्या. आता आपल्याला कळले आहे, खोटे नेरेटीव्ह आपल्याला बदलायचे आहेत. विधानपरिषदेच्या चारही जागांवर आपले उमेदवार आघाडी घेत आहेत, लोकांचे समर्थन घेत आहेत. 1 जुलै रोजी निरंजन डावखरे निवडून येतीलच पण, चारही जागांवर आपली सरशी होईल. या निवडणुकीत नियोजनाचा खरा कस लागणार असल्याचेही फडणवीसांनी म्हटले.