Weather Update : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये पुन्हा एकदा वातावरणात बदल झाला आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडका कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. थंडीसह धुके देखील कमी झाले आहे. थंडी आणि धुके जरी कमी झाले असले तरी देशाच्या अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिल्लीमध्ये पाऊस पडत असताना, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी देखील झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात थंडीचा कहर कमी होताना दिसत असून, उन्हाचा चटका वाढत आहे. फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच नागरिकांना आता उन्हाच्या झळा लागू लागल्या आहेत.
महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच तापमानात चढ उतार होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पर्व भारतासह विदर्भात छगाळ हवामान आहे. धुळे जिल्ह्यात आज पुन्हा तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. त्यामुळे तिथे थंडीचा कडाका वाढला आहे. जिल्ह्यातील किमान तापमान 9.5 अंश सेल्सिअसवर आले आहे. दरम्यान, आज झारखंड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दिल्लीमध्ये काल पावसामुळे किमान तापमानात घसरण झाली आहे. दिल्लीत आज थंडीपासून लोकांना दिलासा मिळणार आहे. दिल्लीत आज किमान तापमान 8 अंश, तर कमाल तापमान 20 अंश राहण्याची शक्यता आहे. दिल्लीत आज लोक सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहेत. तर राजस्थानमधील लोकांना देखील थंडीपासून दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सूर्यप्रकाश बहरताना दिसणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश, तर कमाल तापमान 20 ते 23 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आज बिहारच्या बहुतांश भागात सूर्यप्रकाश राहिल. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 23 अंश, तर किमान तापमान 11 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तराखंडच्या अनेक भागात आज पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या अनेक भागात आज किमान तापमान 5 ते 7 अंशांपर्यंत दिसून येईल, तर कमाल तापमान 15 ते 19 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील अनेक भाग धुक्याच्या गर्तेत सापडला आहे. त्याचवेळी दुपारपर्यंत राज्यात सूर्यप्रकाश येणार आहे. राज्यातील अनेक भागात कमाल तापमान 21 अंश, तर किमान तापमान 10 अंश राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज जम्मूचे किमान तापमान 6 अंश, तर कमाल तापमान 20 अंशांवर दिसून येईल.