अमरावती : अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलाखाली मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर अज्ञातांनी शाई फेकल्याने एकच खळबळ माजली आहे. राजापेठ उड्डाणपूलावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले यावेळी महीला पदाधिकाऱ्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला.


अमरावती शहरातील राजकिय वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. आज सकाळी दोन राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकार्यांनी एकमेकांविरोधात आंदोलन करून निषेध व्यक्त केला. हे आंदोलन संपत नाही.. तर पुन्हा दुपारी मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर काही पुरुष-महिलांनी चक्क शाई फेकून त्यांचा निषेध व्यक्त केला. 


 राजापेठ उड्डाण पुलावरील छत्रपति शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात महिलांनी संताप व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. दुपारी मनपा आयुक्त आष्टीकर हे त्यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचारी आणि मनपा अधिकारीसह उड्डाणपुलाखाली दाखल झाले. तेवढ्यातच दोन महिला आणि काही शिवप्रेमी दाखल होऊन काहीच वेळात मनपा आयुक्त आष्टीकर यांना पकडून त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली.  या झटापटीतून आष्टीकर यांनी पळण्याचा प्रयत्न ही केला. मात्र पुन्हा त्यांचा पाठलाग करून त्यांची कॉलर पकडून दोन महिलांनी शाई फेकून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन तेथून पळ काढला. त्याचंवेळी मनपा आयुक्त आष्टीकर  यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेऊन त्यांना वाहनापर्यंत नेण्यात आले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच महानगरपालिका मधील कर्मचारी-अधिकारी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी कामबंद करून मनपा समोर येऊन आंदोलन सुरू केले. या घटनेचा मात्र संपूर्ण जिल्ह्यात निषेध केला जात आहे...


राणा दाम्पत्यांचं शाईफेक करणाऱ्यांना समर्थन


मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाइफेक केली आणि ज्या शिवप्रेमींनी केली आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी प्रतिक्रिया दिली. पण ज्या चार जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे ते युवा स्वाभिमान पार्टीचेच कार्यकर्ते असल्याचं बोलले जात आहे पण पोलिसांनी अजूनही यावर अधिकृत बोलण्यास नकार दिला आहे.


युवा स्वाभिमान पार्टीच्या पाच जणांना अटक


अखेर मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर हत्येचा प्रयत्न करणारी कलम 307 चा गुन्हा रात्री 10.45 वाजता दाखल करण्यात आला. याप्रकरणी एकूण सात जणांवर विविध कलम लावून गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये पाच जणांना राजापेठ पोलीसांनी अटक केली आहे.. विशेष म्हणजे हे पाच ही जण युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते आहे. ज्यामध्ये प्रसिद्धी प्रमुख अजय बोबडे यांचाही समावेश आहे.


संबंधित बातम्या :


Amravati : मनपा आयुक्तांवर शाईफेक, 'हे' प्रकरण भोवल्याची चर्चा


मनपा आयुक्तांवर शाईफेक करणाऱ्यांना खासदार नवनीत राणांसह आमदार रवी राणांचे समर्थन