Weather Forecast:  एप्रिल महिन्यातच कडक उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना दुसरीकडे मे महिन्यातील हवामान अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. राज्यात मे महिन्यात कमाल तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात उन्हाची झळ कमी बसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 


मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मे महिन्यातही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्यातील अंदाज आज जाहीर करण्यात आला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक राहणार आहे. विदर्भातील काही ठिकाणी देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात देखील काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी तापमानाची शक्यता आहे. विदर्भात एक-दोन जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज असून महिन्यातील दोन दिवस सर्वाधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे. 


तर, दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना उन्हाची कमी झळ बसण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 


देशातील हवामानाचा अंदाज काय?


बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातील किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याशिवाय, उत्तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, तेलंगाणा आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात मे महिन्यात उष्णतेचे दिवस अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


मान्सून कधी येणार?


भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा मे महिन्यात मान्सूनच्या गतीबाबत अंदाज जारी करण्यात येणार आहे. यामध्ये मान्सूनचा वेग कसा आहे हे कळणार आहे. मान्सून साधारणपणे 25 मे ते 1 जून दरम्यान सुरू होतो. यादरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल झालेला असतो. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सून साधारणपणे एक जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. याशिवाय तामिळनाडू, बंगालचा उपसागर, कोकणात 15 जूनपर्यंत मान्सून सक्रिय होतो.


शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी  


जून महिन्यात पावसावर अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्रासाठी चांगली बातमी येऊ शकते. किंबहुना, सामान्य मान्सूनच्या परिस्थितीत पाऊस झाल्यास पिकांना फायदा होऊ शकतो. मात्र, कमकुवत झाल्यास उत्पादनात नुकसान होण्याची शक्यता आहे. यंदाचा मान्सून शेतीसाठी कसा राहील हे पुढील अंदाजात अधिक स्पष्ट होणार आहे.