Maharashtra Monsoon Updates: नेहमीपेक्षा लवकर वर्दी दिलेल्या मान्सून (Monsoon Updates) आतापर्यंत अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये (Maharashtra News) दाखल झाला आहे. काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं (Rain Updates) जोरदार हजेरी लावल्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच 24 जून रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि गोव्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहार आणि झारखंडमध्ये 25 जून रोजी अत्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. 


स्कायमेटनं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. तर कोकण आणि गोवा, दक्षिण गुजरात, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश, सिक्कीम, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह जोरदार पाऊस पडू शकतो. याशिवाय मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पूर्व गुजरात, ओडिशा आणि ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायलसीमा, अंतर्गत कर्नाटक, गंगेचे पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड,  राजस्थानात पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात.


मुंबईत दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार 


गेले काही दिवस अधूनमधून पावसाच्या रिपरिप, मध्येच काळ्या ढगांची गर्दी, तर अचानक उन्हाचा तडाखा, अशा लहरी वातावरणापासून लवकरच मुंबईकरांची सुटका होणार आहे. मुंबईत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून आजपासून पुढील दोन दिवसांसाठी मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आजपासून पुढचे 48 तास मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रत्नागिरी, रायगड आणि पुणे, सातारा कोल्हापूर येथील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


मराठवाड्यातील अनेक भागांत कोसळधार 


मराठवाडय़ातील जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिह्यात आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. हिंगोली जिह्यात पावसाचा जोर अधिक होता. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर जिह्यात हलका पाऊस पडला, तर यवतमाळ, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिह्यात मध्यम पाऊस पडला. 


कोकणातही पावसाची जोरदार हजेरी 


हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होणार आहे. तसेच, कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर येथील घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिह्यासाठी प्रशासनानं आपत्ती निवारण दल आणि शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. अतिमुसळधार पावसाचा अंदाज घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आपत्ती निवारण दलाचे जवान सज्ज आहेत. 


अन्नदात्यासाठी आनंदवार्ता... 


महाराष्ट्र ते कर्नाटक आणि केरळच्या उत्तरेकडील भागात वाऱ्याच्या मध्यम दबावाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून जोरदार वारे वाहू लागले आहेत. तर यामुळेच अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. मुंबईत पुढचे दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान ढगाळ राहणार आहे, तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 आणि 26 अंश सेल्सियस इतकं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.