नाशिक : उत्तर महाराष्ट्रावर पुन्हा एकदा गारपिटीचं सावट आहे. कारण, 23 फेब्रुवारीदरम्यान उत्तर महाराष्ट्रात गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या इशाऱ्यानंतर नाशिकचं जिल्हा प्रशासनही सतर्क झालं आहे.


शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, पिकं उघड्यावर सोडू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात गारपिटीने थैमान घातलं होतं. जालना जिल्ह्याला या गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यानंतर आता पुन्हा उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झालं होतं. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला होता.