पुणे : राज्यात बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यावर्षी भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली असून ती 252 करण्यात आली आहे. शिवाय उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर पहिल्यांदाच बारकोडची छपाई केली जाणार आहे.
पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. राज्यातील 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर संपूर्ण राज्यात 2 हजार 822 परीक्षा केंद्र आहेत.
विज्ञान शाखेचे 5 लाख 80 हजार 820, कला शाखेचे 4 लाख 79 हजार 866 आणि वाणिज्य शाखेचे 3 लाख 66 हजार 756 विद्यार्थी परीक्षा देतील. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 57 हजार 693 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षार्थींमध्ये 8 लाख 34 हजार 134 विदयार्थी, तर 6 लाख 50 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश आहे.
राज्यात 9 हजार 486 महाविद्यालयातून नोंदणी करण्यात आली आहे. राज्यातील 2 हजार 822 केंद्रांवर परीक्षा होईल. विद्यार्थ्यांना सकाळी साडे दहा वाजता परीक्षा केंद्रावर येणं अनिवार्य असेल.
कॉपीचे प्रकार घडू नयेत यासाठी राज्यभरात 252 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी 7 भरारी पथकं असतील.
बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एबीपी माझाकडून शुभेच्छा!