मुंबई: मोठ्या प्रतिक्षेनंतर केरळात दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्राच्या वेशीवरच अडकून पडला आहे. त्यामुळे तूर्तास पेरणी करु नका. असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. गेल्या काही दिवसात मराठवाड्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला. मात्र, या पावसावर विश्वास ठेवून तूर्तास पेरणी करु नये. कारण मान्सूनसाठी अजूनही अनुकूल स्थिती झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी कऱण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी असं आवाहन करण्यात आलं आहे.


 

दरम्यान मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी सध्या पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल परिस्थिती नाही. यंदा मान्सूनचं केरळमध्ये झालेलं आगमन लांबलं. त्यानंतर अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेनं मार्गक्रमण केलं, परंतु कर्नाटकच्या काही भागात पोहोचल्यानंतर मान्सून पुन्हा मंदावला.

 

बाष्पयुक्त ढगांचे प्रमाणही कमी असल्यामुळे आठवडाभर राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. शिवाय जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमीच राहू शकेल. असंही हवानतज्ज्ञांचं म्हणणं आहे. आयएमडीचा अंदाजानुसार राज्यात १३ ते १५ जून या कालावधीत कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.