औरंगाबाद : ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी स्थापन केलेल्या नव्या पक्षाची ध्येय धोरणं अजून जाहीर केलेली नाहीत. मात्र त्यांच्या पक्षाची धोरणं एनडीएसाठी अनुकूल असतील तर त्यांचं एनडीएत स्वागत करु, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.


नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. यानंतर ते एनडीएत सहभागी होतील आणि त्यांच्या राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशीही शक्यता आहे. त्यावर आता रावसाहेब दानवेंकडूनही याबाबत संकेत देण्यात आले आहेत.

राणेंना भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण नाही : दानवे

राणेंचे काँग्रेसमध्ये मदतभेद होते. त्यामुळे ते पक्ष सोडल्यानंतर कुठे जातील, तर भाजपमध्ये जातील, अशी चर्चा रंगली होती. मात्र भाजपने त्यांना अधिकृतपणे पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं नव्हतं, असंही रावसाहेब दानवेंनी सांगितलं.

दिल्लीत नारायण राणेंसोबत अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये राजकीय विषयावरही चर्चा झाली. पण राणेंना भाजपमध्ये येण्यासाठी पक्षाकडून निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, असं दानवेंनी स्पष्ट केलं.

शिवसेनेविरोधातलं अस्त्र म्हणून राणे एनडीएत?

शिवसेनेविरोधात वापर करण्यासाठी राणेंना एनडीएत घेतलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र कुणाला उत्तर देण्यासाठी कुणाचा बळी आम्ही घेणार नाही. भाजपकडे सक्षम नेते आहेत, असं दानवेंनी स्पष्ट केलं.

नारायण राणेंना एनडीएत घेतल्यास शिवसेना बाहेर पडणार- सूत्र

नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला एनडीएत घेतलं तर शिवसेना बाहेर पडणार, अशी माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणे एनडीएत दाखल होतील आणि त्यांना राज्यात मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांनी पक्ष स्थापनेची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी अधिक काळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केली. शिवाय शिवसेनेच्या नेत्यांशीही राणेंचं फारसं पटत नाही. त्यामुळे राणेंकडे मंत्रिमंद असताना शिवसेना मंत्री आणि राणे मांडीला मांडी लावून बसणार का, हा सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे.

पाहा व्हिडिओ :