मुंबई : नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला एनडीएत घेतलं तर शिवसेना बाहेर पडणार, अशी माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणे एनडीएत दाखल होतील आणि त्यांना राज्यात मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे.


नारायण राणे यांनी पक्ष स्थापनेची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी अधिक काळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केली. शिवाय शिवसेनेच्या नेत्यांशीही राणेंचं फारसं पटत नाही. त्यामुळे राणेंकडे मंत्रिमंद असताना शिवसेना मंत्री आणि राणे मांडीला मांडी लावून बसणार का, हा सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे.

राणे एनडीएत आल्यास त्यांचं स्वागत – दानवे

नारायण राणे यांनी पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांना तासाभरातच एनडीएत सहभागी होण्यासाठी आमंत्रण आल्याची माहिती आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. राणेंनी त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं अजून जाहीर केलेली नाहीत. मात्र ते एनडीएत आले तर त्यांचं स्वागत करु, असं दानवेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

राणेंना कोणतं खातं देणार? भाजप मंत्र्यांमध्ये अस्वस्थता

आपल्याकडचं महत्त्वाचं खातं काढून राणेंना देऊ नये, यावरुन भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थता आहे. त्यामुळे महत्त्वाचं खातं काढून घेऊ नये, यासाठी भाजप मंत्र्यांची धडपड सुरु आहे. राणेंना मंत्रिमंडळात घ्यावं, मात्र इतरांना धक्का लावू नये, अशी भाजप मंत्र्यांची भावना आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नारायण राणेंना महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खातं मिळण्याची शक्यता आहे. सध्या ही खाती चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहेत. त्यामुळे यापैकी एक खातं राणेंना दिल्यास चंद्रकांत पाटील यांच्याकडील एक खातं जाण्याची शक्यता आहे.

‘महाराष्ट्र स्वाभिमान’ राणेंचा नवा पक्ष

काँग्रेसला रामराम केल्यानंतर नारायण राणे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र स्वाभिमान असं राणेंच्या नव्या पक्षाचं नाव आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. लवकरच या पक्षाची नोंदणी करणार असल्याचं राणेंनी सांगितलं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्गमधील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकला. तसंच राणेंच्या भाजप प्रवेशाच्याही चर्चा सुरु होत्या. भाजपाध्यक्ष अमित शाहांची भेटही राणेंनी दिल्लीत जाऊन घेतली होती.

संबंधित बातम्या :

‘महाराष्ट्र स्वाभिमान’ नारायण राणेंचा नवा पक्ष


पक्ष स्थापनेच्या तासाभरात राणेंना एनडीएत येण्याचं आमंत्रण : सूत्र