मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजप 2019 ची लोकसभा निवडणूक आणि राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकाही जिंकेल. आम्ही फक्त 2014 च्या निवडणुकांची पुनरावृत्तीच करणार नाही, तर त्यापेक्षा चांगली कामगिरी करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.


राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी सिंचन घोटाळा, आगामी निवडणुका, शिवसेनेसोबत युती आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती यावर उत्तरं दिली.

युतीचा विश्वास

शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असला तरी आमची युती होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. ''शिवसेना हा आमचा जुना मित्र आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमची जुनी मैत्री आहे. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह आणि मायावती यांसारखे कट्टर शत्रू असलेले एकत्र येऊ शकतात, तर आम्ही का येऊ शकत नाही,'' असं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या युतीबाबत कोणतीही चर्चा सुरु नाही. पण निवडणुका जवळ आल्यानंतर आम्ही युतीचा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

सरकारमध्ये असूनही शिवसेना सतत विरोध करत असते. पण याचा सरकारच्या कामकाजावर प्रशासकीयदृष्ट्या कोणताही परिणाम होत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मतभेद हे असू शकतात, पण ते आम्ही चर्चेतून सोडवतो. गेल्या चार वर्षात आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, जे आघाडी सरकारने 14 वर्षांच्या काळातही घेतले नव्हते, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

जलयुक्त शिवारचं समर्थन

जलयुक्त शिवार योजना फोल ठरली असल्याच्या वृत्ताचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं. राज्यात काही वर्षांमध्ये उत्पादन वाढलंय हे जलयुक्त शिवारचं यश असल्याचं ते म्हणाले. 2013-14 मध्ये 124 टक्के पाऊस पडूनही उत्पादन 137 लाख मेट्रिक टन होतं. 2016-17 मध्ये 97 टक्के पाऊस पडला आणि उत्पादन 223 लाख मेट्रिक टन होतं. 2017-18 मध्ये पाऊस 84 टक्के पडला आणि उत्पादन 180 लाख मेट्रिक टन होतं, असं म्हणत जलयुक्त शिवारने फायदा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राचं पथक येणार आहे. केंद्र सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यासाठी नियम ठरवलेले आहेत. पथकाने पाहणी केल्यानंतर केंद्र सरकारचा निर्णय होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सिंचन घोटाळा

राज्यातील सिंचन प्रकल्पाची कामं वेगाने सुरु आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 40 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणलं आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचं काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होईल. सिंचन घोटाळ्याची चौकशी कोर्टाकडून सुरु असून लवकरच सत्य समोर येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

भीमा कोरेगाव प्रकरण

भीमा कोरेगाव प्रकरणी आणखी काही जण रडारवर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत ज्यांना अटक करण्यात आली त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत. अटक करण्यात आलेले संत नाहीत. देशामध्ये यांच्याकडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातं. ते भीमा कोरेगाव दंगलीत सहभागी नसतील, पण तशी परिस्थिती निर्माण करण्यामध्ये त्यांचा हात असू शकतो, अशी शंका मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केली.

दरम्यान, सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव अगोदरच केंद्राकडे गेलेला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राने आणखी माहिती मागवली आहे. आम्ही केंद्राला सहकार्य करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. धनगर आरक्षणासाठी 'टिस'चा (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स) अहवाल सरकारला प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.