उस्मानाबाद : मराठवाड्याच्या काही भागात दुष्काळाचं सावट आहे. पावसाने यंदा ओढ दिल्यामुळे पाणी आणि शेतीचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. या शेतकऱ्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊसाऐवजी बीट लावण्याचा सल्ला दिला आहे.


शरद पवार यांची ऊस उत्पादकांचे आणि कारखानदारांचे नेते अशीच खास ओळख आहे. दुष्काळ आला की ऊसाच्या पिकांची चर्चा सुरु होते. ऊसावरच्या कोणत्याही टीकेला शरद पवारच उत्तर द्यायचे. पण यंदा बारमाही पाणी पिणाऱ्या ऊसाला आता शरद पवारांनीच पर्याय सुचवला आहे.

साखरेच्या उत्पादनासाठी युरोपभर बीटचा वापर केला जातो. बीट आणि ऊसाच्या लागवडीमध्ये खर्चात फारसा फरक नाही. ऊस बारा महिन्यांचे पीक, तर बीट चार महिन्यांचे. ऊसाच्या तुलनेत बीटमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे. बीट पिकाला ऊसापेक्षा कित्येक पटीने कमी पाणी लागतं, असं पवार म्हणाले.

बारामतीच्या कृषी विकास केंद्राने बीट लागवडीचा प्रयोग गेल्या वर्षी केला. आपल्या वातावरणात टिकतील अशा बीटच्या सात वाणांची लागवड केली. एकरी पस्तीस ते चाळीस टन उत्पादन आलं.

सह्याद्रीच्या डोंगर रांगानी महाराष्ट्राची विभागणी केली आहे. शंभर वर्ग किलोमीटरचा प्रदेश पर्जन्य छायेचा बनला आहे. त्यामुळे असे पर्याय शोधावे लागणारच.