बळीराजासाठी महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू : मोदी
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2018 01:18 PM (IST)
"आधीच्या सरकारने शेवटच्या चार वर्षात केवळ 25 लाख घरं बांधली होती, तर आम्ही गेल्या चार वर्षात 1 कोटी 25 लाख घरं बांधली"
शिर्डी : मला माहितंय महाराष्ट्रात पाऊस कमी पडलाय. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून केंद्र सरकार उभं राहील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शिर्डीत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घराच्या चाव्या वाटण्यात आल्या. त्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला. “महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट आहे. 2015 मध्ये केंद्र सरकार हिमालयाप्रमाणे आमच्या पाठीशी होतं. यंदाही सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी उभं राहिली अशी आशा आहे.”, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच व्यासपीठावरुन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला पंतप्रधानांनी प्रतिसाद देत पंतप्रधान मोदी म्हणाले, "माझ्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पाऊस कमी पडला. मात्र, मी तुम्हाला आश्वासन देतो की, पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत मिळेल. त्यासाठी महाराष्ट्र सरकार जी पावलं उचलेल, त्यांच्या खांद्याला खांदा लावून केंद्र सरकार मदत करेल.", असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच, देशातील शेतकऱ्यांना पाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून प्रलंबित योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच माध्यमातून महाराष्ट्रात अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम केले जात आहे, अशी माहिती मोदींनी दिली. "पिकांना दर मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एमएसपीबाबत शेतकऱ्यांची जुनी मागणी आमच्या सरकारने पूर्ण केली आहे. सरकारने ऊसासह खरीप आणि रबीच्या 21 पिकांना एमएसपीपेक्षा 50 टक्के जास्त दर दिला आहे.", असेही मोदींनी सांगितले. आधीच्या सरकारने शेवटच्या चार वर्षात केवळ 25 लाख घरं बांधली होती, तर आम्ही गेल्या चार वर्षात 1 कोटी 25 लाख घरं बांधली, असे सांगताना मोदी पुढे म्हणाले, "आधीचं सरकार सरासरी 18 महिन्यात एक घर बांधत असे, आता 12 महिन्यात एक घर बांधलं जात आहे. त्याचसोबत, घर बनवण्यासाठी देण्यात येणारा 70 हजार रुपयांचा मदतनिधी वाढवून 1 लाख 20 हजार रुपये केला आहे." "महाराष्ट्राच्या भूमीने कायमच सामाजिक समरसतेचा संदेश देशाला दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो किंवा महात्मा ज्योतिबा फुले असो, या सर्वांनी समता आणि एकतेची मूल्य रुजवली. आपल्या या महापुरुषांचे विचार कायम लक्षात ठेवले पाहिजेत आणि स्वार्थासाठी समाजात भेद निर्माण करणाऱ्या शक्तींना पराभूत केले पाहिजे.", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.