शिर्डी: शिर्डी दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सर्वात आधी मोदींनी नंदुरबारच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी लाभार्थ्यांनी मोदींशी हिंदीतून संवाद साधला. मात्र मोदींनी थेट मराठीतच संवाद साधत, लाभार्थ्यांचं अवघडलेपण दूर केलं.


कसं काय? घरं कसंय? असा प्रश्न मोदींनी विचारला. त्यावर घरकुल मिळालेला लाभार्थी म्हणाला, बरं आहे. घर चांगलं आहे.

त्यावर मोदींनी विचारलं, आता तुम्ही प्रसन्न आहात का? तर त्यांना हो म्हणून लाभार्थ्याने उत्तर दिलं.

मोदी आणि लाभार्थ्यांमधील संवाद

मोदी- कसं काय

लाभार्थी - बरं आहे

मोदी - काही आज मिठाई केली का? नवीन घर मिळालं, मिठाई वगैरे केली की नाही

लाभार्थी - भजन केलं, मिठाई केली.

मोदी -  माझ्यासाठी पाठवणार का

लाभार्थी - साहेब तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, तुमच्यासोबत टीव्हीवर बोललो तर फार आभाराची गोष्ट वाटते.

मोदी - घर कसंय

दुसरा लाभार्थी- छान आहे साहेब

मोदी - तुम्हाला बरं वाटलं का

महिला लाभार्थी – हो

मोदी -  मिठाई बनवली, मग मला का नाही पाठवली

महिला लाभार्थी - नंदुरबारला या सर..

मोदी -  मी पूर्वी नंदुरबारला खूप येत होतो. नंदुरबारला चौधरींचा चहा…लक्षात आहे काय चौधरींचा चहा….. जेव्हा जेव्हा रेल्वेने जातो तेव्हा तेव्हा चौधरींचा चहा दिला जातो..

असं म्हणत मोदींचा आणि नंदुरबारच्या लाभार्थ्यांचा संवाद पूर्ण झाला.

अमरावतीच्या लाभार्थ्यांशी संवाद

या वर्षी विशेष दसरा आहे तुमचा. घरकुल मिळालं. कसं वाटतंय, असा प्रश्न मोदींनी विचारला. त्यावर अमरावतीच्या लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

घरकुल मिळवण्यासाठी अर्ज केल्यापासून ते घर मिळेपर्यंत कोणाला लाच द्यावी लागली का, खरं सांगा? असा प्रश्न मोदींनी अमरावतीच्या महिला लाभार्थ्यांना विचारला. त्यावर महिलांनी कोणालाही एक रुपायाही द्यावा लागला नाही असं सांगितलं. त्यावर मोदींनी देशात हाच बदल अपेक्षित असल्याचं सांगितलं.

मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विविध जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मोदींच्या हस्ते घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना चावी देण्यात आली.  महाराष्ट्रात अडीच लाख  तयार घरांचं वाटप करण्यात आलं. चार लाख घरं महाराष्ट्रात बांधण्याचं उद्दीष्ट आहे.

2019 पर्यंत टार्गेट पूर्ण करु - मुख्यमंत्री

दरम्यान, प्रत्येकाला घराचं मोदींचं स्वप्न महाराष्ट्रात 2019 पर्यंत पूर्ण करु असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  गरिबांच्या आयुष्यात परिवर्तन करण्याच्या ज्या योजना मोदींनी आणल्या आहेत, त्या सर्वप्रथम महाराष्ट्रात पूर्णपणे लागू करु.  2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न आहे, पण महाराष्ट्रात ते आम्ही 2019 पर्यंतच पूर्ण करु, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.