सातारा : छत्रपतींचे तेरावे वंशज आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. मात्र दसऱ्याच्या निमित्ताने उदयनराजेंचे ज्येष्ठ पुत्र वीरप्रतापसिंह राजे भोसले यांचीही क्रेझ पाहायला मिळाली.
जलमंदिरात म्हणजे त्यांच्या राहत्या निवासस्थानी वर्षातून एकदाच वाड्यातील देवी आणि राजेंचं दर्शन मनसोक्त करता येतं. यावर्षी उदयनराजेंसोबत त्यांच्या मुलाची क्रेझ जास्तच दिसून आली. शिवरायांचे चौदावे वंशज म्हणजेच उदयनराजे भोसले यांचे ज्येष्ठ चिरंजीव वीरप्रतापसिंह राजे भोसले नेहमीप्रमाणे पूजेला बसले होते.
पूजेनंतर ते बाहेर आले, तेव्हा चाहत्यांची मोठी झुंबड उडाली. वीरप्रतापसिंह राजेंसोबत फोटोसेशन करण्यासाठी चाहते गर्दीतून वाट काढत होते. वीरप्रतापसिंह उदयनराजेंच्या गाडीत बसले, तरी गर्दी काही हटता हटेना. सेल्फीवर सेल्फी सुरुच होते.
विशेष म्हणजे सेल्फी घेणाऱ्यांमध्ये बच्चे कंपनींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. त्यामुळे भविष्यात वीरप्रतापसिंह राजकीय वर्तुळात दिसले, तर नवल नाही.