अकोला :  निवडणूक आली की, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) राजकीय आघाडीची मोठी चर्चा सुरू होते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चर्चेनंतरही ही आघाडी होऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेत 42 लाख आणि विधानसभेत 27 लाखांवर मतं घेत काँग्रेस आघाडीचे मोठं नुकसान केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं आंबेडकरांशी भविष्यात जुळवून घेण्याची संकेत दिलेत. प्रकाश आंबेडकरांशी आघाडीच्या दृष्टीने चर्चा करणार मोठं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole)  केलं आहे. ते आज अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. 


सध्या नाना पटोले काँग्रेसच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी भविष्यातील आघाडीच्या मुद्द्यावर संकेत दिलेत. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा करणार असल्याचं पटोले म्हणालेत. काही छोट्या पक्षांशीही आघाडीसंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, सध्या आंबेडकरांशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. 


पटोलेंचा पुनश्च: स्वबळाचा नारा


दरम्यान, अकोल्यातही नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. शरद पवार यांनी 2024 मध्ये 'महाविकास आघाडी' एकत्रित निवडणूक लढणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरही नाना पटोले यांनी शरद पवारांचा 'एकी'चा दावा खोडून काढला. शरद पवार काय म्हणालेत हे आपल्याला ठावूक नाही. मात्र, आपल्या काँग्रेस पक्षाची भूमिका आपणच जाहीर करणार असल्याचं पटोले यांनी निक्षून सांगितलं. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार असल्याचं ते म्हणालेत. यासोबतच 2024 मध्ये काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याचं भाकीत केलं आहे. 


नानांच्या संजय राऊतांना कानपिचक्या 


दरम्यान, संजय राऊतांना आजच्या सामनातील अग्रलेखांवरून नाना पटोलेंनी त्यांना तिरकस टोला लगावला आहे. संजय राऊंतांच्या मार्गदर्शनातच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडूनच आम्ही शिकत असतो. तेच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत असतात. संजय राऊतांनी संघटनात्मक बांधणी भाजपकडून शिकण्याच्या सल्ल्यावरही टीका केली आहे. आम्हाला भाजपकडून काहीच शिकण्याची कोणतीच गरज नसल्याचा टोला यावेळी पटोले यांनी राऊंतांना लगावला. 


मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्याला नानांनी दिली बगल 


नाना पटोले यांनी 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री पदावर दावा करणार का?, या प्रश्नावर पटोलेंनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले की, 'आपण लोकांचे काम करणारा कार्यकर्ता आहे. खुर्चीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवणे यालाच आपले सातत्याने प्राधान्य असते. त्यामुळे कोणत्या पदाची आस ठेवून काम करीत नसल्याचे सांगत स्वत:च्या  मुख्यमंत्रीपदाबद्दलच्या मुद्द्याला बगल दिली. यावेळी त्यांनी केंद्रानं विविध पिकांचं जाहीर केलेलं किमान आधारभूत मुल्य कमी असल्याचं सांगत केंद्रावर टीका केली.