नागपूर : ‘महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण विदर्भाचा विकास कुणीही केला नाही. त्यामुळे आम्हाला वेगळा विदर्भ हवा आहे’, अशी मागणी श्रीहरी अणे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर त्यांनी हे विधान केलं आहे. 


वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर शरद पवार काय म्हणाले होते?

राज ठाकरे - थोड्या वेगळ्या विषयाकडे जातो. वसंतराव नाईक 11 वर्षे, सुधाकरराव नाईक अडीच वर्षे, कन्नमवार दीड-एक वर्षे आणि आज देवेंद्र फडणवीस साधारण तीन-साडेतीन वर्षे, इतके मुख्यमंत्री विदर्भातून महाराष्ट्राला लाभल्यानंतरही विदर्भ स्वतंत्र व्हावा, अशी मागणी का होते?

शरद पवार - त्याचा इतिहास थोडा वेगळा आहे. आपण या परिसरात वाढलेलो, इकडचं सामाजिक वातावरण आणि तिकडच्या गोष्टींमध्ये फरक आहे. मराठवाड्यामध्ये अनेक वर्ष निजामाचे राज्य होते. मराठवाड्याच्या लोकांमध्ये निजामाच्या राजवटीसंदर्भात आकस होता, नाराजी होती आणि त्यांच आकर्षण उर्वरित महाराष्ट्राकडे होतं. त्यामुळे मराठवाड्यात कुणी म्हटलं की, 'स्वतंत्र मराठवाडा करा' तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही. विदर्भाची परिस्थिती थोडी वेगळी आहे. नागपूर ते अकोल्याचा जो भाग आहे, तो एकेकाळी मध्य भारताचा भाग होता. मध्य भारत नावाचं स्वतंत्र राज्य होतं. त्या राज्याची भाषा हिंदी होती. त्यामुळे हा संबंध हिंदी भाषिकांचा प्रदेश होता. त्याच्यातही दोन भाग आहेत, वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, अकोला आणि वाशिम हा मराठी भाषिक याला वऱ्हाड म्हणतात आणि नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया याला विदर्भ म्हणतात. आजही त्या भागात गेलो, तरी तिथे हिंदी बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

राज ठाकरे - मग विदर्भ स्वतंत्र व्हायची जी मागणी होते आहे, ही चार जिल्ह्यांची आहे फक्त?

शरद पवार - प्रामुख्याने तिथली आहे. त्याचेही नेतृत्त्व करणारा माणूस फार कमी आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा माणूस मूलत: मराठी माणूस नाही. तो अन्य भाषिक आहे. त्याला हिंदीबद्दलची आस्था आहे. त्याला सातत्याने वाटतं की, वेगळं राज्य आलं, तर हे नेतृत्त्व आपल्या हातात येईल. आज एकसंध महाराष्ट्र झाल्यामुळे वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले. जर उद्या विदर्भ वेगळा झाला, तर त्याच्या नेतृत्त्वाचे वाटेकरी म्हणून अमराठी माणूस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे स्वप्न ज्यांच्या मनात आहे, त्यांचा आग्रह आहे. पण तिथला मराठी माणूस स्वतंत्र विदर्भाच्या बाबतीत मनापासून पुरस्कर्ता नाही. मी मात्र तिथे भूमिका स्पष्ट केली की, तुम्हाला हवे असेल तर लोकमत सिद्ध करावं. पण लोकमत कुणी घ्यायला तयार नाही, कारण त्यांना माहित आहे लोकमत त्यांना मिळणार नाही.

VIDEO :



संबंधित बातम्या :

दाऊदबाबतच्या आरोपांवर शरद पवार काय म्हणाले?

राज ठाकरेंच्या ‘रॅपिड’ प्रश्नांवर शरद पवारांची ‘फायरिंग’

आरक्षण आर्थिकदृष्ट्या असावं, मग तो कुठल्याही जातीचा असो : पवार

मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही : शरद पवार

राज ठाकरेंनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत जशीच्या तशी...

राज ठाकरेंचे तुफान प्रश्न, शरद पवारांची सडेतोड उत्तरं