बीड : नेहमीच राज्याचं लक्ष लागून असतं त्या परळी विधानसभेची निवडणूक यावेळी शिवसेनाही लढणार आहे. ''निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 'मातोश्री'वरुन हाच संदेश घेऊन मी आलो आहे,'' अशी घोषणा शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांनी केली.


शिवसेनेच्या या घोषणेनंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ही लढत परळी विधानसभा मतदार संघात तिरंगी होणार, असे चिन्ह दिसू लागले आहेत.

परळी हा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. धनंजय मुंडे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपमधून बाहेर पडले होते. तेव्हापासूनच या मतदारसंघात भाऊ-बहिणीत मोठी लढत पाहायला मिळते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर गेल्या निवडणुकीत शिवसेनेने परळी मतदारसंघातून उमेदवार उभा केला नव्हता.

शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी शिवसैनिकांसमोर बोलताना साबणे यांनी ही घोषणा केली. शिवसंपर्क मोहिमेसाठी परळी शहरातील भागवत पॅलेस मिटिंग हॉल येथे घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना येणाऱ्या निवडणुकीला कशा पद्धतीने समोर जाणार, यावर चर्चा करण्यात आली.

निवडणूक लढवणारांचं स्वागत : पंकजा मुंडे

दरम्यान, कुणी परळी मतदारसंघातून निवडणूक लढवत असेल तर त्यांचं स्वागत, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. ''या विधानाबाबत माहिती नाही. मात्र कुणी निवडणूक लढवत असेल तर स्वागत आहे. त्यावेळी कोण निवडणूक लढवेल माहीत नाही. जे काही असेल निवडणूक लढवावी लागेल, त्याशिवाय जिंकण्यात मजा नाही. मी मागच्या दाराने आलेले नाही, जनतेतून निवडून आले आहे,'' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला.