कोल्हापूर : केंद्रात नवे सरकार अस्तित्वात आले आहे, मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे आणि आता सरकारचे कामकाजही सुरु झाले आहे. परंतु संसदेच्या सभागृहातील कामकाज अद्याप सुरु झालेले नाही. लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक अजून शिल्लक आहे. एनडीएतील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळावे यासाठी मागणी केली आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या (महालक्ष्मी) दर्शनाला आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दर्शन आटोपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेला लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळावे ही मागणी असल्याचे जाहीर केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, आमची इच्छा आहे की आम्हाला लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळावे. उपाध्यक्षपद आम्ही हक्काने मागतोय.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही भारतीय जनता पक्षासोबत हिंदुत्वासाठी युती केली आहे, पदांसाठी नाही. लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळावी ही आमची इच्छा आहे. आम्ही ते पद हक्काने मागत आहोत. आपली माणसं म्हटल्यावर हक्क आलाच.

...तर जनता आमच्यावर विश्वास ठेवणार नाही : संजय राऊत

मोदींच्या केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेला केवळ एकच मंत्रीपद मिळाले. परंतु शिवसेनेला दोन किंवा तीन मंत्रीपदे मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे शिवसेनेची भापजवर नाराजी आहे का, असा सवाल केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आमची भाजपवर नाराजी नाही. आमचं सगळं नीट सुरु आहे. जेव्हा नाराजी होती, तेव्हा आम्ही ती व्यक्त केली होती.

उपाध्यक्षपदावर कोणाचा अधिकार?

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही चर्चा समोर आलेली नाही. लोकसभेचा उपाध्यक्ष कायमच विरोधी पक्षामधूनच निवडला जातो. ज्यात विरोधी पक्ष परस्पर सहमतीने या पदासाठी व्यक्तीची निवड करतात. मात्र मागच्या वेळी मोदी सरकारने ही परंपराही बदलली.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात उपाध्यक्ष पद एआयएडीएमकेच्या एम.थंबीदुरई यांच्याकडे होतं. त्यावेळी विरोधकांनी आरोप केला होता की, "मोदी सरकारबाबत एआयएडीएमकेची भूमिका सौम्य आहे, त्यामुळेच त्यांना हे पद देण्यात आलं."