शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पवार आज संध्याकाळी पाच वाजता नवी दिल्लीतील 10 जनपथवरील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या दोन्ही नेत्यांमध्ये 45 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही, असं त्यांनी सांगितलं.
शरद पवार म्हणाले की, "सोनिया गांधींसोबत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. मी त्यांना सविस्तर माहिती दिली. ए के अँटोनी या बैठकीत उपस्थित होते. पुढील चर्चेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्यांची भेट होईल आणि ते आम्हाला कळवतील." एकसूत्री कार्यक्रमासाठी समन्वय समिती समितीची कुठलीही बैठक झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा - महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीचं सरकार यावं, खासदार नवनीत राणांची इच्छा
येत्या 1-2 दिवसात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भेटणार : रणदीप सुरजेवाला
यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या भेटीची ट्विटरद्वारे माहिती दिली. त्यांनी लिहिलं आहे की, "शरद पवारांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. येत्या एक-दोन दिवसात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होईल, त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात पुढे काय करायचं याचा निर्णय होईल."