नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच अजूनही सुटलेला दिसत नाही. नेमकं कुणाचं सरकार येणार याबाबत अजूनही चित्र स्पष्ट दिसत नसताना आता अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार यावं अशी इच्छा बोलून दाखवली आहे. नवनीत कौर राणा यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, राष्ट्रवादी आणि भाजप अशा नव्या समीकरणाची चर्चा काही दिवसांपूर्वी होत होती. मात्र नंतर अशी चर्चा बंद झाली. आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार बनावं, असं नवनीत कौर राणा यांनी म्हटलं आहे. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं आहे. मोदींकडून राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचं कौतुक करणं बरंच काही सांगून जात आहे. पवार आणि मोदी यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रात सत्तास्थापना करावी, असे त्या म्हणाल्या.

शिवसेनेवर केली टीका
नवनीत कौर राणा यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली. बेईमान लोकांमुळे आज महाराष्ट्रात अशी स्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीआधी शिवसेना-भाजप एकत्र होते. मात्र आता महत्वाकांक्षा वाढल्यामुळे शिवसेनेने भाजपची साथ सोडली आहे, असेही त्या म्हणाल्या. लोकसभेत देखील नवनीत राणा यांनी शिवसेनेमुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याचा आरोप केला. तसंच शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना असेल तर मी स्वत:चं घरही पेटवू शकते असं सांगत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.


हे ही वाचा - सत्ता स्थापनेबाबत चर्चा नाही, आघाडीतील मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही : शरद पवार

120 आमदारांचा पक्ष मुख्यमंत्रीपदाचा दावा कसा सोडेल

नवनीत कौर राणा म्हणाल्या की, लोकांनी निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या युतीला मतदान केलं. आज भाजपकडे 120 आमदार आहेत. यात 105 भाजपचे आणि 15 अपक्षांचा समावेश आहे. अशी स्थिती असताना शिवसेना मुख्यमंत्री पदाची मागणी करत आहे. 120 आमदारांचा पाठिंबा असणारी भाजप मुख्यमंत्रीपदाचा दावा कसा सोडेल? असा सवाल त्यांनी केला. 56 आमदार असताना शिवसेना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघत आहे, असेही त्या म्हणाल्या.

लोकसभेतही नवनीत राणा आक्रमक
आज, लोकसभेत बोलताना देखील नवनीत राणा या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. शिवसेनेमुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याचा आरोप केला. तसंच शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना असेल तर मी स्वत:चं घरही पेटवू शकते असंही त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात जो ओला दुष्काळ पडला आहे, राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे याच्या मागे जर कोणाचा हात असेल तर तो शिवसेनेचा आहे. जर शेतकऱ्यांवर इतकं प्रेम आणि सहानूभुती आहे तर मग तिथे सरकार स्थापन करायचं होतं. शिवसेनेने स्वत:चा स्वार्थ आणि घराचा विचार केला, असे नवनीत राणा म्हणाल्या.