बीड : एकेकाळी ज्या बीड जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर हा राज्यात सगळ्यात कमी होता, आता मात्र मुलीला जन्म देणाऱ्या माता फेटा घालून मिरवत आहेत. बीड जिल्हा आता राज्यातील मुलींच्या जन्मदरामध्ये सन्मानजनक जिल्ह्यांमध्ये जाऊन बसला आहे. आजमितीला बीड जिल्ह्यात 1000 मुलांमागे तब्बल 961 मुली आहेत.


कसा वाढला मुलींचा जन्मदर?

2010 - 2011 मध्ये 1000 मुलामागे फक्त 810 मुली

2015 - 2016 मध्ये 1000 मुलामागे  898 मुली

2016 - 2017 मध्ये 1000 मुलामागे  927 मुली

2017 - 2018 मध्ये 1000 मुलामागे 936 मुली

2018 - 2019 मध्ये 1000 मुलामागे तब्बल 961 मुली

मुलींच्या जन्माचा वाढलेला टक्का ही बाब केवळ बीडकरांसाठीच नाही तर राज्यासाठी सुद्धा अभिमानाची आहे, मात्र या जिल्ह्याचा इतिहास विसरुन चालणार नाही. याच जिल्ह्यामध्ये कसाई डॉक्टरांनी कोवळ्या कळ्या खुडण्याचा गोरखधंदा सुरु केला होता. 2012 मध्ये आरोग्य विभागाने अवैध गर्भपात केंद्र बंद केली. कसाई डॉक्टर असलेल्या सुदाम मुंडेसारख्या डॉक्टरांना गजाआड केले आणि म्हणूनच स्त्रीभ्रूण हत्येच्या कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांना याची जरब बसली. याचा परिणाम मुलींच्या जन्माचा टक्का वाढला.

स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसून काढण्यासाठी आरोग्य यंत्रणासोबतच जिल्ह्याचे प्रशासन खडबडून जागं झालं, त्यांच्या सोबतीला सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार पुढे आले. एकीकडे कायद्याची दहशत आणि दुसरीकडे मुलींच्या जन्माच्या स्वागतापासून तिच्या हक्कासाठी लढणारे माणसं लढत राहिली आणि स्त्रीभ्रूण हत्येचा लागलेला कलंक पुसून काढून एक नवा इतिहास निर्माण केला.

महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत बीड जिल्ह्यात सगळंच काम सकारात्मक आहे असं नाही. पण 'बेटी बचाओ बेटी पढाओ'पासून 'माझी कन्या भाग्यश्री' अशा योजनांमुळे मुलींच्या या जन्माचं संरक्षण होऊ लागलं. स्वाभाविकपणे ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यांमध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत होऊ लागलं आणि हा इतिहास रचला गेला.