ऊस दरासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत तोडगा काढण्यात सरकारला यश आलं आहे. ऊस दरासंदर्भात झालेल्या बैठकीत प्रतिटन उचलीला 200 रुपयांचा वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या प्रश्नावरुन आक्रमक झाली होती. या बैठकीनंतर राजू शेट्टी एबीपी माझाशी बोलत होते.
ऊस दरावरुन यंदा संघर्ष टाळला आहे. रघुनाथ पाटील बैठकीला होते, पण तो दर मान्य करायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला हा दर पटला, तो आम्ही मान्य केला. पण जर त्यांच्या आंदोलनाने शेतकऱ्यांना अजून वाढीव दर मिळणार असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे असे, असं म्हणत राजू शेट्टी यांनी रघुनाथ पाटील यांना टोला लगावला.
''शरद पवारांचे काही चिमटे जीवघेणे, तर काही गुदगुल्या करणारे''
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नेहमीच चिमटे काढत असतात. यातील काही चिमटे जीवघेणे असतात आणि काही चिमट्यांनी गुदगुल्या होतात. पण शेतकरी आंदोलन म्हणजे साखर कारखानदारी मोडीत काढायला उभी केलेली आंदोलनं असं त्यांचं आजपर्यंत मत होतं. यावेळी मात्र त्यांनी साखर कारखानदारांना कार्यपद्धती सुधारा, नाहीतर टिकणं अवघड होईल, असा इशारा दिला. म्हणजे आमची संघटना जो विचार मांडतेय तो कुठेतरी पवार साहेबांना पटतोय आणि आमच्या संघटनेचा विचार त्यांना पटायला लागलाय असे दिसत आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले.
''गुजरातच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणार''
गुजरातमधल्या शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय झाला आहे. विकासाचं खोटं मॉडेल उभारत असताना तिथल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यामुळे गुजरातमधील निवडणुकीत जर एखादा शेतकरी नेता शेतकऱ्यांच्या बळावर निवडणूक लढवत असेल तर त्याच्या प्रचाराला मी जाईन आणि एक शेतकरी नेता म्हणून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असं राजू शेट्टी म्हणाले.