अमरावती : मुंबईतील जात पडताळणी समितीने नवीन वाद निर्माण केला आहे. समितीने नवनीत कौर राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंग कुंडलेस यांच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत दोन वेगवेगळे निर्णय घेतल्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे.


जात पडताळणी समितीने नवनीत राणा यांचे मोची जातीचे प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. परंतु त्यांचे वडील हरभजन सिंग कुंडलेस यांचे मोची जातीचे प्रमाणपत्र मात्र अवैध ठरवलं आहे. नवनीत राणा या आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत.

अमरावती लोकसभा मतदार संघ हा एससी साठी राखीव आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. तेव्हापासून शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ आणि नवनीत कौर यांच्यात हा जात प्रमाणपत्रावरुन वाद सुरु आहे.

नवनीत कौर राणा याची जात ही मोची नसून लभाना आहे असा आरोप अडसूळ यांनी केला होता. मात्र जात पडताळणी समितीने नवनीत राणा यांचे मोची जातीचे प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे.