मुंबई : राज्याला पर्यायी सरकार देणं ही आमची जबाबदारी आहे. सरकार शिवेसेनेसोबत बनवणार हे जरी खरं असले तरी काँग्रेसचा निर्णय होईपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर नवाब बोलत होते.

नवाब म्हणाले, आज सकाळी पक्षाची बैठक झाली. बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच दिल्लीतही काँग्रेसच्या कार्यकारी कमिटीची चर्चा झाली आहे. काँग्रेसकडून जोपर्यंत अधिकृत निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही भूमिका घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुक ही काँग्रेससोबत लढवल्याने त्यांचा निर्णय आल्याशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही. शिवसेनेसोबत सरकार सत्तास्थापन करण्यास राष्ट्रवादी तयार असली तरी काँग्रेसच्या निर्णय आल्यानंतरच राष्ट्रावादी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, बैठकीत सध्या राज्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. अजून पक्षाचा कोणताही निर्णय झालेला नाही. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलवून त्यांच्याशी चर्चा करुन दुपारी चार नंतर काँग्रेस अंतीम निर्णय घेणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर राज्यातील वेगवान राजकीय घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेनं एनडीएमधूनतन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, केंद्रात मंत्री असलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे. सावंत यांनी घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. तर भाजपाचा मुख्यमंत्री नको, असं राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व पक्षांच मत असल्याच सांगत शिवसेनेनं सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं एक पाऊल टाकलं आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा सुरु आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृत प्रस्ताव देण्यात आला आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेकडे अवधे साडे पाच तास उरले आहे.