मुंबई: भाजप सत्ता स्थापन करण्यात असमर्थ ठरल्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला संधी दिली आहे. आज (11 नोव्हेंबर) संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्याचा अवधी दिला गेला आहे, मात्र कमी वेळ मिळाल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला. भाजपला सत्तास्थापनेसाठी 72 तास दिले गेले होते परंतु शिवसेनेला फक्त 24 तासांचा अवधी मिळाला हा राऊतांचा आक्षेप होता. बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्त वेळ देणं अपेक्षित होतं अनेक लोकांना एकत्र करुन सरकार स्थापन करण्यात वेळ लागतो ही खंत त्यांनी व्यक्त केली. पण राज्याला राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने 'ढकलायचंच' या 'चं' वर जोर देऊन ज्यांनी काम केलं त्यानुसार ही पावलं पडत आहेत, असा जोरदार आरोप संजय राऊत यांनी केला.


भाजप सर्वात मोठ्या संख्येने आमदार असल्याचा पक्ष असल्याने काल भाजपला बहुमत सिद्ध करण्याची संधी राज्यपालांनी दिली होती, मात्र शिवसेना सोबत नाही त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असमर्थता व्यक्त केली. सोबतच जनादेशाचा अनादर करुन राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जात असल्याने शिवसेनेला शुभेच्छा देत टोलाही लगावला.


Sanjay Raut | भाजपला सत्ता स्थापनेसाठी 72 तास, शिवसेनेला फक्त 24 तास? राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पावलं, संजय राऊतांचा आक्षेप | ABP Majha


युती आणि फॉर्म्युल्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ न देण हा भाजपचा अहंकार आहे. आम्ही सत्ता लाथाडू पण कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा मुख्यमंत्रीपद आणि 50-50 फॉर्म्युल्यावर विचार करणार नाही, हा भाजपचा निर्णय होता. युतीपूर्वी ठरलेल्या गोष्टींवर चर्चा करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही, असंही राऊत म्हणाले. स्थिर सरकार देणं खरंतर भाजपची जबाबदारी होती त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांवर त्यांनी टीका-टिप्पणी करु नये, ज्यांनी खोटेपणाने राज्याला यात ढकललं ते खरे गुन्हेगार आहेत असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला.


भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं निवेदन अत्यंत दु:खद आणि खेदजनक आहे, भाजप सत्ता स्थापन करु शकला नाही याचं खापर त्यांनी शिवसेनेवर फोडणं चुकीचं आहे, असं संजय राऊत म्हणाले. युती होण्यापूर्वी ठरलं त्यानुसार गोष्टी घडल्या असत्या तर आज "विरोधीपक्षात बसायला तयार आहोत" सांगायची वेळ आमच्या मित्रपक्षावर आली नसती आणि हे वागणं म्हणजे जनतेचा अपमान आहे असं संजय राऊत म्हटलं.


आज सकाळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं ट्वीट केलं होतं. यावर संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या आदेशानं अरविंद सावंत राजीनामा देतील आणि एका मंत्रीपदासाठी त्या वातावरणात कशासाठी राहावं असं म्हणत शिवसेनेची केंद्रातील भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हे दुर्दैव आहे आणि याचे धनी आम्ही नाही तर भाजप आहे अशी टीका संजय राऊतांनी मित्रपक्षावर केली. मात्र आम्ही शेवटपर्यंत राज्याला स्थिर सरकार मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करु असा विश्वास राऊत यांनी जनतेला दिला आहे. सोबतच भाजपचं शिवसेनाविरोधात काहीतरी षडयंत्रही सुरु असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.