Nitesh Rane on Shiv sena : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्या मुंबई महापालिकेच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. तर नारायण राणे आज स्वतः अधीश बंगल्यात उपस्थित आहेत. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गातील ओरोस पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. त्यावेळी बोलताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. यावेळी बोलताना महाराष्ट्राच्या प्रधान सेवकानं जनतेला भेटलेलं चित्र आम्हाला सुद्धा पाहायचंय, सुडाचं राजकारण करून राज्य पुढे जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत, असं ते म्हणाले आहेत. तसेच संजय राऊतांनी भांडूपमध्ये लक्ष घालावं, असा सल्लाही यावेळी नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. 


मुंबई महापालिकेचे अधिकारी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी केली. यासंदर्भात बोलताना भाजप आमदार नितेश राणे बोलताना म्हणाले की, "मुंबईत जुहूमधील अधिश बंगल्यात स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि निलेश राणे बंगल्यावर उपस्थित आहेत. ते संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतील आणि यावेळी आम्ही योग्य ते सहकार्य करू. तसेच मालवणमधील नीलरत्न बंगल्या संदर्भात आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं ही नोटीस काढली की, महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालयानं काढली हे पहावं लागणार आहे."


पाहा व्हिडीओ : महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालयाने नोटीस काढली हे पहावे लागणार 



सुडाचं राजकारण करून राज्य पुढे जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे : नितेश राणे 


मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत नितेश राणे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ आहे. मात्र जनतेला भेटायला, त्यांचे  प्रश्न सोडवायला वेळ नाही, असा खोचक टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. मुठी दाखवून आव आणायचा आणि घरी जाऊन बेडवर झोपायचं, याचा काही उपयोग नाही. महाराष्ट्राच्या प्रधान सेवकानं जनतेला भेटलेलं चित्र आम्हाला सुद्धा पाहायचा आहे. सुडाचं राजकारण करून राज्य पुढे जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत."


स्वतः एकही निवडणूक न लढवलेल्या माणसानं कुठेही लक्ष घातलं, तर काय फरक पडतो? : नितेश राणे 


गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या वाद पाहायला मिळत आहे. यावेळी नितेश राणेंनीही संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊत यांनी भांडुपमध्ये लक्षं घालावं. पुढच्यावेळी त्यांचा भाऊ निवडून येण्यासाठी तिथे बोंबाबोंब आहे. नागपूर राहिले लांब, नागपूरमध्ये त्यांनी नंतर लक्ष घालावं. बेळगावमध्येसुद्धा त्यांनी विशेष लक्ष घातलं होतं. काय झालं बेळगावमध्ये? असा खोचक टोलासुद्धा संजय राऊतांना आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. स्वतः एकही निवडणूक न लढवलेल्या माणसानं कुठेही लक्ष घातलं, तर काय फरक पडतो? नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तिथे ऐरेगैरे लोमते लोक आले, तर काही फरक पडणार नाही." 


बाळासाहेबांचं संरक्षण करताना जीवाची पर्वा न करता संरक्षण केलं, त्यांच घर पाडण्याची नोटीस काढता : नितेश राणे 


शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यावर बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कडवट शिवसैनिक सत्य बोलत आहे, अशी प्रतिक्रिया दिली. "बाळासाहेबांच्या रक्षणासाठी नारायण राणे यांनी जिवाची पर्वा केली नव्हती. हे त्यावेळचे कडवट शिवसैनिक बोलत आहेत. आजचे टवाळके राणे साहेबांवर टीका करतात, त्यांनी जुन्या कडवट शिवसैनिकांकडून साहेबांच्या रक्षणासाठी आणि साहेबांचं जिवाची पर्वा न करता संरक्षण केलं ते पहावं. ज्या बाळासाहेबांच्या संरक्षणासाठी जीवाची परवा न करता संरक्षण देण्याचं काम नारायण राणे यांनी केलं. त्यांचं संरक्षण काढण्याचं काम त्यांच्या मुलानं केलं. साहेबांचं राहतं घर तोडण्याचं काम बाळासाहेबांचे पुत्र मुख्यमंत्री स्वतः करत आहेत, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी यावेळी केला. राणेंना दिला जाणारा त्रास कडवट शिवसैनिकांना बघितला जात नाही आहे. बाळासाहेबांचं संरक्षण करताना जीवाची पर्वा न करता संरक्षण केलं, त्यांच घर पाडण्याची नोटीस काढता. आज जर बाळासाहेब असते तर कोणत्या शब्दात मुलाला बोलले असते, हे मी आता सांगू शकत नाही."


पर्यटन मंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे अडीच वर्षांनी सिंधुदुर्गात, किती प्रेम सिंधुदुर्गावर, कोकणावर? : नितेश राणे 


"पर्यटन मंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे अडीच वर्षांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. म्हणजे किती प्रेम सिंधुदुर्गावर, कोकणावर? कोरोना काळात उध्वस्त झालेल्या पर्यटन व्यावसायिकांना भेटण्यासाठी तेव्हा का आले नाहीत? नेमकं आज कशासाठी येत आहेत? हे कळत नाही. त्यांना विनंती आहे की, नुसतं येऊ नका, पर्यटन व्यावसायिकांना पॅकेज जाहीर करून जावा. आर्थिक पॅकेज जाहीर करा. अर्थमंत्र्यांना गाडीत घेऊन फिरताना त्यांना आम्ही पाहिलंय, त्याचा फायदा आमच्या जिल्ह्याला झाला पाहिजे. नुसतं येऊन टोमणे मारणे किंवा बंगला तुटला की नाही हे पाहण्यासाठी येता आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.", असं नितेश राणे म्हणाले. 


संभाजीराजेंची सगळी आंदोलनं 'ब्रेक के बाद' : नितेश राणे 


"मराठा आरक्षणासाठी संभाजी राजेंचे 26 फेब्रुवारीला उपोषण आहे. ब्रेक के बाद त्यांची सगळी आंदोलनं आणि उपोषणं असतात. आंदोलनं करतात, ब्रेक घेतात, परत आंदोलनं करतात. संभाजी राजेंचे उपोषण हे मराठा आरक्षणासाठी असावं, ते स्वतःच्या खासदारकीसाठी असू नये.", असं म्हणत नितेश राणेंनी संभाजीराजे छत्रपतींवरही निशाणा साधला आहे.