याबाबत आज लातूर शहरात शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीला लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांच्यासह शहरातील अनेक गणेशमंडळाचे पदाधिकारी हजर होते. या सर्वांसमोर एकच प्रश्न होता कि यावर्षी गणेश विसर्जन कुठे आणि कसे करावे? यावर तोडगा काढत मोठ्या गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जित न करता दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या गणेशमूर्ती त्याच बरोबर मानाच्या गणेशमूर्ती या लातूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात ठेवण्यात येणार आहेत. पाणी टंचाईमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला गणेश मंडळांनी सहकार्य करावे आणि त्याच जोशात सण साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशमूर्ती विसर्जनाऐवजी हे आहेत उपाय सुचवण्यात आले आहेत :
- गणेशमूर्ती मंदिरात ठेवणे
- गणेशमूर्ती दान करणे
- मंडळाकडे जागा असल्यास जतन करून ठवणे
- घरगुती गणेशमूर्ती घरातच पाण्यात विसर्जन करणे
प्रशासनाने शहरात पाच ठिकाणी मूर्ती दान करण्यासाठी ठिकाणं निश्चित केली आहेत. याच ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती आणून देण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे.
शहरातील गणेश मंडळांनी काय घेतला निर्णय ?
शहरात एकूण 317 मोठी गणेश मंडळं आहेत. यापैकी 59 मंडळांनी एकवर्ष मूर्ती जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 मंडळांनी मूर्तिकारास गणेशमूर्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. 207 गणेश मंडळं प्रशासनास मूर्ती दान करणार आहेत. तर 39 गणेश मंडळांनी जिल्ह्याबाहेर मूर्ती विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे.
लातूर शहरातील सर्व गणपती मंडळांनी प्रशासनास सहकार्य करून एकमुखाने ज्या उपाय योजना ठरवल्या आहेत त्यावर अंलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी देखील त्यांच्या गणपतीचे घरातच विसर्जन करणार असल्याचे सांगितले आहे.
मागील पंचवीस वर्षापासून असलेल्या लातूरचा राजा गणपती मंडळाने या वर्षी गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. कायमच भव्य मूर्ती असलेले हे मंडळ आहे. मात्र पाण्याच्या अभावामुळे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत.
- शाम जाधव (अध्यक्ष, लातूरचा राजा गणेश मंडळ)
मागील अठरा वर्षापासून औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाने फायबरची मूर्ती स्थापन केली आहे. त्यावेळपासून आम्ही दरवर्षी एक ते सव्वा फुटाच्या विसर्जनासाठीच्या मूर्तीची स्थापना करत आलो आहोत. अश्याच प्रकारे इतरही गणेश मंडळाने केल्यास भविष्यात अशी समस्या उद्भावणार नाही, असे मत मंडळाचे मार्गदर्शक नागेश कानडे यांनी व्यक्त केले आहे.