इंदापूर : इंदापूरच्या जागेसंदर्भातून झालेल्या रणसंग्रामानंतर काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी अखेर भाजपचा झेंडा हाती घेतला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरची उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की,  आम्ही मागील पाच वर्षे डोळे लावून बसलो होतो की कधी हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश होईल पण तो काही कारणांनी होत नव्हता.  भाजप एक बृहत परिवार आहे. हा परिवाराचा पक्ष नाही तर हा पक्षच एक परिवार आहे, असे ते म्हणाले.

अनेक मुख्यमंत्र्यांचे बुलेट प्रूफ जॅकेट म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी आजपर्यंत काम केले. नंतर त्याच बुलेट आणून आम्हाला परत करायचे आणि सगळं सांभाळून घ्यायचे. संसदीय कार्य मंत्री म्हणून दोन्ही सभागृहाला सोबत घेऊन, अतिशय संयमाने काम केले. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा आम्हाला निश्चित उपयोग होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

निवडणुकीचा निकाल जनतेच्या मनात ठरला आहे, असे सांगत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरची उमेदवारी देण्याचे संकेत दिले.

मी कुठलीही अट घालून भाजपात आलेलो नाही - हर्षवर्धन पाटील

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आजचा ऐतिहासिक दिवस आहे.  आमचा समाज अन्यायग्रस्त समाज आहे. अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ताकद द्यावी. मी कुठलीही अट घालून भाजपात आलेलो नाही, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कधीच टेन्शन पाहिलं नाही. आता त्यांच्या चेहऱ्यावर अजून हर्ष दिसेल कारण आता तुमच्याकडे हर्षवर्धन आलेला आहे.

माझ्या मतदारसंघाची भौगालिक परिस्थिती माहिती आहे. मित्र आणि शत्रू बदलू शकतो पण शेजारी बदलू शकत नाही.  तुमच्या मनात आलं तर आमच्या जिल्ह्यात धो धो पाणी येईल, असेही ते म्हणाले. यावेळी भाषणादरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी भाजप कार्यकर्ते वगळून सर्वांचा उल्लेख केला. त्यामुळे एका भाजप कार्यकर्त्याने भाषणामध्येच त्यांना 'आम्ही ही आलोय' याची आठवण करून दिली. त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांनी 'आता मीच भाजपात आलोय. यांना विश्वासच पटेना की मी आलोय' असे म्हणताच एकच हशा पिकला.

त्यावेळेस हर्षवर्धन पाटील आमच्यासोबत असते तर सुप्रियाताईंनाही घरी पाठवलं असतं - चंद्रकांत पाटील
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेच्या दोन दिवस आधी हा निर्णय घेतला असता तर बारामती बाबतचा संकल्प पूर्ण झाला असता आणि ते खासदार झाले असते.  आम्ही ठरवलं होतं माढा, पवारांना पाडा. मात्र पवारांनी वेळीच माघार घेतली. मात्र त्यावेळेस हर्षवर्धन पाटील आमच्यासोबत असते तर सुप्रियाताईंनाही घरी पाठवलं असतं, असे ते म्हणाले.  मात्र ते हुशार राजकारणी आहेत, लोकसभेचा निकाल लागल्यावर बघू असं त्यांनी तेव्हा ठरवलं होतं. नाहीतर ते तेव्हाच भाजपात आले असते. युतीचेच सरकार येणार असून ते मोठ्या बहुमताने येणार आहे. आधी घोषणा केली होती की अब की बार 220 पार, आता ही घोषणा मागे पडली असून आता यापेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.  हर्षवर्धन यांना आश्वस्त करतो की त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही ते म्हणाले.

या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यासोबत हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील, पुत्र राज्यवर्धन पाटील आणि त्यांचे कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते.