औरंगाबाद : औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त शहरातील खडकेश्वर भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये ओली पार्टी केली. खर तर कोविड मुळे सर्वसामान्य लोकांना हॉटेलमध्ये जेवणात बंदी आहे, दारू पिण्यास बंदी अजून बंधन आहेत. मात्र दुसरीकडे ज्यांच्यावर कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे तेच अधिकारी मात्र कायद्याला धाब्यावर बसून पार्टीत झिंगाट गाण्यावर झिंग उतरेपर्यंत नाचलेले पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार यातील एका अधिकाऱ्यांच्या लग्नाचा वाढ दिवस होता. त्यासाठी या पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी एक - दोन वर्षात निवृत्त झालेले काही अधिकारी आणि सध्या सेवेत असलेलं काही अधिकारी पार्टीला हजर होते. या पार्टीसाठी हॉटेलमध्ये एका हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. वेटर दिमतीला होते. पार्टी रंगात आल्यावर झिंगाट गाण्यावर अधिकाऱ्यांनी ताल धरला. या पार्टीत सहभागी होते औरंगाबाद क्राइम ब्रान्च एपीआय अनिल गायकवाड शहर वाहतूक शाखेचे श्रीकांत नवले यासह अन्य काही अधिकारी उपस्थित होते.
या व्हिडीओमध्ये गायकवाड नवले यांच्यासह एक-दोन वर्षापूर्वी रिटायर एक दोन वर्षापुर्वी रिटायर झालेले अधिकारी झिंगाट गाण्यावर बेधुंद होऊन नाचत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर आम्ही श्रीकांत नवले यांना या पार्टीविषयी विचारले असता, त्यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी आयोजित केल्याचं सांगितलं. मात्र घरगुती पार्टी असल्याचं नवले म्हणाले .मात्र ही पार्टी खडकेश्वर भागातील कृष्णा इन हॉटेलमध्ये झाल्याचं दुसऱ्या अधिकाऱ्यांनी कबूल केले.
सर्वसामान्य लोकांसाठी हॉटेल पार्सलसाठी उघडी आहेत. मात्र पोलिस अधिकारी यांच्यासाठी हॉटेल कशासाठी उघडी आहेत, हे या व्हिडिओ मधून स्पष्ट होत आहे. त्यामुळे नियम हे सामान्य लोकांसाठी असतात का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
औरंगाबाद शहरात दोन दिवसापूर्वी निखिल गुप्ता नावाचे पोलीस आयुक्त रुजू झाले आहेत. त्याच रात्री या पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे नवनियुक्त पोलीस आयुक्त अशा आपल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार का हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे .कारण याच अधिकाऱ्यांना घेऊन पोलीस प्रशासनाचा गाडा त्यांना चालवायचा आहे.