पंढरपूर : टेंभूच्या पाण्यातून माण नदीतील बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी गेले आठ दिवस जनावरांसह सुरु असलेल्या 14 गावांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सांगोला शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. गेले आठ दिवसांपासून दीपक पवार आणि दत्ता टापरे हे दोन तरुण सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असून दोघांचीही प्रकृती खालावली आहे.
काल पुण्यात यासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने परिस्थिती चिघळत चालली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या 14 गावांतील शेतकरी आपल्या जनावरांसह सांगोला तहसील कार्यालयासमोर तळ ठोकून बसल्याने प्रशासनावरील ताण वाढत चालला असताना जलसंपदा विभागाकडून मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संतप्त बनले आहेत.
टेंभू योजनेतील पाण्याने बलवडीपासून मेथवडेपर्यंतचे बंधारे कमीतकमी 25% भरुन देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी राज्यमंत्री शिवतारे यांच्या बैठकीत देखील दोन तासांच्या चर्चेनंतर तोडगा न निघाल्याने आता सोमवारी मुख्यमंत्री याबाबत हस्तक्षेप करतील अशी अपेक्षा आहे. सांगोल्यात सध्या भीषण पाणीटंचाई असल्याने पशुधन व शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असून पाणी आल्याशिवाय उपोषण मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे.
सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख सोमवारी या प्रश्नावर आता थेट मुख्यमंत्र्याना साकडे घालणार असून सांगोल्यातील इतर नेतेही मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. या प्रश्नावर जनतेचा रेटा वाढवण्यासाठी आज सांगोला शहर व तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळून पाठिंबा देण्यात आला आहे.
सांगोल्यात कडकडीत बंद, टेंभूचे पाणी पेटले!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Nov 2018 08:06 PM (IST)
टेंभूच्या पाण्यातून माण नदीतील बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी गेले आठ दिवस जनावरांसह सुरु असलेल्या 14 गावांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सांगोला शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -