मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने येत्या 29 व 30 नोव्हेंबर रोजी देशभरातील शेतकरी संसदेला घेराव घालणार आहेत. या ऐतिहासिक आंदोलनात महाराष्ट्रातून लाखो शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले आहे.
खा. राजू शेट्टी यांनी संसदेत मांडलेल्या शेतकऱ्यांची 'संपूर्ण कर्जमुक्ती विधेयक 2018' आणि 'शेतीमालाला मालाला दीडपट हमीभाव 2018' या दोन विधेयकांवर तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे या प्रमुख मागण्या आहेत.
204 संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित
खा. राजू शेट्टी यांच्या अथक प्रयत्नातून देशातील शेतकऱ्यांच्या 204 संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित आल्या आहेत. यातूनच देशपातळीवर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचा जन्म झाला. शेट्टी आणि समितीच्या नेत्यांनी संपूर्ण देशभर दौरे करून विविध राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचा कर्जबाजारीपणा, देशभरात शेतकऱ्यांचे सुरू असलेले आत्महत्येचे सत्र यामागील कारणे व त्यावरील उपाय योजना याचा अभ्यास करून स्वाभिमानीचे नेते खा. राजू शेट्टी यांनी ‘शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती विधेयक 2018’ आणि ‘शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव 2018’ हे दोन विधेयक तयार करून ते लोकसभेत मांडले. या दोन्ही विधेयकावर व शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी समितीने केली आहे.
25 हून अधिक पक्षांचा आंदोलनात सहभाग
मात्र केंद्र सरकारने अद्याप या मागणीला प्रतिसाद दिला नाही. यासाठी आता अ. भा. किसान संघर्ष समन्वय समितीने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. त्यातून देशभरातील शेतकऱ्यांचे 29 व 30 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे संसदेवर ऐतिहासिक घेराव आंदोलन आयोजित केले आहे. देशातील 25 हून अधिक पक्षांचा या आंदोलनात सहभाग राहणार आहे.
यामध्ये विविध राज्याचे मुख्यमंत्री, माजी पंतप्रधानांचाही समावेश आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी, ममता बॅनर्जी, उमर अब्दुल्ला, मायावती, अखिलेश यादव, शरद यादव या दिग्गज नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
'स्वाभिमानीच्या' वतीने कोल्हापुरातून स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था
महाराष्ट्रातून स्वाभिमानीच्या वतीने दिल्लीला जाण्यासाठी कोल्हापूर येथून स्वतंत्र रेल्वे आरक्षित करण्यात आली असून खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात ही ‘स्वाभिमानी एक्सप्रेस’ 28 नोव्हेंबर रोजी दिल्लीसाठी रवाना होणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले आहे.
देशभरातील शेतकरी संसदेला घेराव घालणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Nov 2018 05:58 PM (IST)
खा. राजू शेट्टी यांनी संसदेत मांडलेल्या शेतकऱ्यांची 'संपूर्ण कर्जमुक्ती विधेयक 2018' आणि 'शेतीमालाला मालाला दीडपट हमीभाव 2018' या दोन विधेयकांवर तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे या प्रमुख मागण्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -