Chhatrapati Sambhaji Nagar News: समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) काम अजूनही अनेक ठिकाणी अर्धवट असून, याचा मोठा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसतो. असाच काही प्रकार वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात घडला. मात्र या घटनेनंतर शेतकऱ्यांने घेतलेल्या भुमिकेमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. समृद्धी महामार्गावरील अर्धवट नाल्यांमुळे कांदा (Onion) चाळीत पाणी शिरल्याने संतप्त या शेतकऱ्याने थेट समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर ट्रॅक्टर आडवा लावला. शेतकऱ्याचे 500 क्विंटल पेक्षा जास्त कांद्यांचे नुकसान झाल्याने त्याने थेट 'समृध्दी' महामार्गच रोखला. शेवटी पोलिसांनी समजूत काढत यापुढे पाणी येणार नसल्याचे आश्वासन दिल्यावर या शेतकऱ्यांने ट्रॅक्टर बाजूला घेत रस्ता मोकळा केला. 


वैजापूर तालुक्यातील जांबरगाव परिसरातील महामार्गावरील अर्धवट नाल्यांमुळे पावसाळ्यात पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाते. दरम्यान गुरुवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी समृद्धी महामार्गावरून वाहत दोन्ही बाजूच्या शेतांत शिरले. गट क्रमांक 31 मधील सुनील भोसले, जनार्दन भोसले, पोपट भोसले, दीपक भोसले व गट क्र. 50 मधील देविदास साठे, राजेंद्र साठे यांच्या शेतात हे पाणी शिरले होते. तसेच जांबरगावच्या बाजूला असलेल्या साठे यांची समृद्धीलगतच शेतात कांदाचाळ आहे.


थेट ट्रॅक्टर आडवा लावून वाहतूक बंद पाडली


पाणी शेतात शिरल्यावर साठे यांचा कांदा पाण्यात भिजला. कांदाचाळीत गुडघाभर पाणी जमा झाल्याने कांदा त्यावर तरंगू लागला. चाळीत पाणी शिरल्याचे समजल्यावर साठे यांनी तत्काळ शेतात धाव घेतली. तसेच मेहनतीने पिकविलेला कांदा पाण्यात भिजून खराब झाल्याने संतप्त साठे यांनी थेट ट्रॅक्टरसह समृद्धीवरील टोलनाका गाठला. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आलेली वाहने ज्या ठिकाणी उतरतात तेथेच साठे यांनी आपला ट्रॅक्टर आडवा लावून वाहतूक बंद पाडली. 


पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तब्बल तासभराने रस्ता मोकळा झाला 


अचानक झालेल्या या प्रकाराने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. साठे यांनी वाहतूक बंद पाडल्यावर परिसरातील शेतकरी व नागरिक या ठिकाणी जमा झाले. महामार्गावरील पाण्याचा त्रास होत असल्याने साठे यांना परिसरातील इतर शेतकऱ्यांनी देखील पाठींबा दिला. परिस्थिती गंभीर बनत असल्याने नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वैजापूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी देविदास साठे, राजेंद्र साठे यांच्याशी चर्चा करत यापुढे पाणी येणार नसल्याची हमी दिली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तब्बल तासभराने साठे यांनी ट्रॅक्टर बाजुला घेतला आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Video : कांद्यावर जुगार खेळलो मला अटक करा, शेतकऱ्यांचा भावनिक व्हिडिओ व्हायरल