मुंबई : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यावर वरुण राजाने सध्या चांगलीच कृपा केली आहे. मराठवाड्यात सध्या सर्वत्र तुफान पाऊस बरसतो आहे. त्यामुळे आटलेल्या विहिरी, तलाव सर्वच जलमय झाले आहेत. आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्यावतीने राबविण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेतील अंबाजोगाईमधील पाटोदा येथील विहिरी जलमय होत आहेत.

 

आमीर खान आणि सत्यजित भटकळ यांनी पुढाकार घेऊन दुष्काळाशी दोन हात करण्याच्या उद्देशाने पाणी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या मार्फत 20 एप्रिलपासून सुमारे १६३ गावांमध्ये वॉटर कप स्पर्धा सुरु करण्यात आली होती. या स्पर्धेअंतर्गत बीडमधील अंबाजोगाई, साताऱ्यातील कोरेगाव, आणि अमरावतीतील वरुड गावातील ग्रामस्थांना एकत्रित करून 'जलमित्र सेना' स्थापन केली. या सेनेला पाणी फाऊंडेशनने जलसंधारणासंदर्भात प्रशिक्षण दिले.

 

सध्या या स्पर्धेतील सहभागी गावांमध्ये मोठी जलक्रांती झाल्याचे पाहायला मिळत आहे. अंबाजोगाईतील पाटोदा येथील विहिरी भरायला सुरूवात झाली आहे. पाणी फाऊंडेशनने जेव्हा हे काम हाती घेतले, तेव्हा राज्यातील हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. महाराष्ट्रात हजारो हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धी निर्माण करण्याचा संकल्प केला होता. पाणी फाऊंडेशनच्या या संकल्पाला मूर्त स्वरूप येताना पाहायला मिळत आहे.