नवी दिल्ली: मुस्लिमविरोधी प्रतिमा पुसण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठं पाऊल टाकलं आहे. संघाकडून चक्क इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. दोन जुलैला ही इफ्तार पार्टी होत असून, यासाठी पाकिस्तानसह विविध मुस्लिम देशांच्या राजदुतांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

 

संघाची सहयोगी संघटना 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने ही पार्टी आयोजित केली आहे.

 

'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने यापूर्वीही अनेक इफ्तार पार्टी दिल्या आहेत. मात्र यावेळी जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने आपल्या सदस्यांना देशभरात इफ्तार पार्टी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच यामध्ये सर्वधर्मीयांना आमंत्रित करण्यास सांगितलं आहे.

 

जगाला भारतीयत्वाचा संदेश देण्याच्या उद्देशाने ही पार्टी आयोजित केली आहे, असं संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी सांगितलं. जगातील मुस्लिम राष्ट्रांसाठी भारत एक आशेचं किरण आहे. त्यामुळे सर्व समुदायातील नागरिकांमध्ये बंधूभाव वाढावा, हा या पार्टीमागचा उद्देश असल्याचंही इंद्रेश कुमार म्हणाले.

 

दरम्यान, आरएसएसचं हे पाऊल म्हणजे मुस्लिम विरोधी इमेज बदलण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे. दोन जुलैला दिल्लीत ही इफ्तार पार्टी होत आहे.