लातूर : अंबाजोगाई शहरासह बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना करण्यात येणारा पाणी पुरवठा येत्या 1 ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणार आहे. मांजरा धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्वच योजनांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी घेतला आहे.
मांजरा धरणातून बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षापासून मांजरा धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. या धरणातून लातूर, अंबाजोगाई सारख्या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यावर्षीही पावसाळा संपत आला तरी धरणक्षेत्रात पाण्याचा एक थेंबही जमा झालेला नाही. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेला सर्वच पाणी पुरवठा अडचणीत आला आहेत.
मराठवाड्यातील पाणी संकट लक्षात घेत अडचणींवर मात करण्यासाठी मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणारे लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धरणातून होणारा पाणी पुरवठा 1 ऑक्टोबरपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. यापुढे प्रत्येक घरी केवळ 200 लिटर पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
लातूर महापालिकेचे 600 टँकरचे नियोजन
लातूर महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे शहरातील लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी 600 टँकरचे नियोजन केले आहे. शहरातील गरजेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल, असं महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.