वाशिम : वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या वाशिममधल्या एका गावात अनोखा विवाहसोहळा पार पडला. शेतातील बांधावर सामुहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे नवरदेव-नवरी यांनीही श्रमदान केल्यानं गावाचा उत्साह द्विगुणित झाला.


परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान यांच्या संकल्पनेतून 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी संकटाचा सामना कसा करावा, याचा मंत्र देण्यात येत आहे.

या स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील एकमेव कारंजा तालुक्याची निवड झाली. या अनोख्या उपक्रमाचा एक भाग म्हणून काकडशिवनी येथील ग्रामस्थांनी सामुहिक लग्नसोहळा तसंच महाश्रमदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं. तो कार्यक्रम चक्क शेतातील बांधावर ठेवण्यात आला होता.

या लग्नसोहळ्यात गावकरी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच वऱ्हाडी मंडळींनी श्रमदान केले. विशेष म्हणजे नवरदेव आणि नवरींनीही यावेळी श्रमदान करुन एक नवीन पायंडा पडला आहे. या विवाहामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना आधी श्रमदान करावं, नंतरच विवाह सोहळ्यात सहभागी व्हावं, अट ठेवण्यात आली होती.

महत्त्वाचं म्हणजे लग्नात लागणारा खर्च हे चार वधू-वराच्या कुटुंबांनी श्रमदानसाठी दिले. गावातीलच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील मंडळींनी लग्नाला हजेरी लावली आणि श्रमदान करुन गाव पाणीदार होण्यासाठी हातभार लावला.