वाशिम: जळगाव जिल्ह्यात 25 जानेवारीपासून गोद्री  येथे होणाऱ्या अखिल भारतीय बंजारा महाकुंभ मेळाव्यावरून बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी महंतामध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. शिवबंधन बांधलेल्या  महंत  सुनील महाराज  यांनी  भाजप संघ परिवार महाकुंभ मेळाव्याला प्रति पोहरादेवीच दर्जा देत असल्याचा आरोप केला. यामुळे बंजारा समाजाच्या काशी असलेल्या पोहरादेवीचे  महत्त्व कमी करण्याचा डाव आल्याचा सुनील महाराज यांनी आरोप केला. तर धर्मपीठाचे  महंत  जितेंद्र महाराज यांनी गोद्रीच्या  महाकुंभ मेळाव्याला  उपस्थित राहा असे आवाहन  केले आहे.


धर्म जागरण बंजारा संस्कृती, लव जिहाद आणि धर्मांतर यावर चर्चा  होणार आहे. आयोजनात भाजपातील काही लोक असल्याने  त्याचा  फायदा भाजपला  फायदा  होणार असल्याचा समज  चुकीचा असून धर्म संरक्षणासाठी  बंजारा बांधवांनी एकत्र यावे असे जितेंद्र महाराजांनी  आवाहन केले आहे.  मात्र त्यामुळे या कुंभमेळाव्यात जायचे की नाही असा प्रश्न बंजारा समाजातील लोकांना पडला आहे.


बंजारा समाजाची काशी ही पोहरादेवीच असून येथील महत्त्व कमी करण्यासाठी भाजप-आरएसएस प्रयत्न करत आहेत. हा मेळावा पोहरादेवी येथे झाला असता तर ते योग्य राहिलं असतं पण तसं जाणून बुजून करण्यात आले नाही. त्यामुळे या कुंभमेळाव्यात बंजारा समाजातील लोकांनी जाऊ नये असं आवाहन पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी केला. 


 दुसरीकडे याच पोहरादेवीचे दुसरे महंत जितेंद्र महाराज यांनी जाहीर आवाहन केले आहे की,  25 ते 30 जानेवारी दरम्यान होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात सर्व गोर बंजारा लोकांनी हजेरी लावावी. कुठं कुठं धर्मांतर होत आहे तर कुठे लव जिहादसारखे प्रकार घडत आहेत. हे सगळं त्या कुंभ मेळाव्याच्या माध्यमातून सरकारी दरबारी मांडता येईल. त्यामुळे  कुंभमेळाव्याला सर्व बंजारा बांधवांनी यावे अस महंत जितेंद्र महाराज म्हटलंय.


 या सगळ्यावर मात्र, बंजारा समाजाचे पोहरादेवीचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी या कुंभ मेळाव्याबद्दल सांगितले की, हा मेळावा बंजारा समाजाचा आहे. आमच्याशी चर्चा करूनच या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. यात पक्षाचं काहीही देणं घेणं नाही. सगळ्या बंजारा समाजाचे बांधव यात सहभागी होतील असं बाबूसिंग महाराज म्हणाले.  त्यामुळे आता हे मतभेदाचे वाद विकोपाला  जातांना दिसतेय. दोन महंतांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे बंजारा समाजात संभ्रम निर्माण झाला असून नेमकं याठिकाणी जायचं की नाही असा प्रश्न बंजारा समाजाच्या लोकांना पडला आहे. येत्या काळात याचे दुरोगामी काय परिणाम होतात हे  पाहावे लागेल