वाशिम : ही बातमी वाचून, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा का देऊ नये, असा प्रश्न तुम्हालाही पडेल. कारण याच मंत्र्यांच्या हेटाळणीमुळे एका वृद्ध कास्तकऱ्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

निसर्गानं पाठ दाखवली, तर मंत्र्यांनी परिस्थितीची कुचेष्टा केली. अखेर हतबल झालेल्या वृद्ध शेतकऱ्यानं मृत्यूलाच कवटाळलं. वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या सोयजना गावात राहणाऱ्या ज्ञानेश्वर मिसाळ यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी मिसाळ यांनी स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या बेगडी मंत्र्यांचा पर्दाफाश केला. ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या 8 एकर शेतात गेल्या 4 वर्षांपासून काहीच उगवलं नाही. त्यांनी राज्य कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांना भेटून व्यथा मांडण्यासाठी मुंबई गाठली. मात्र एका वृद्ध शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर मारण्याऐवजी, सदाभाऊ खोतांनी मिसाळ यांची कैफियत हसण्यावारी उडवून दिली.

मंत्र्यांना सांगूनही प्रश्न सुटला नाही, शेतकऱ्याची आत्महत्या


सदाभाऊ खोतांनी निराशा केल्यानंतर ज्ञानेश्वर मिसाळ यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथंही त्यांना न्याय मिळाला नाही. जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची व्यथा ऐकण्यासाठी वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनाही सवड मिळाली नाही.

मंत्र्यांचे उंबरठे झिजवून थकलेल्या ज्ञानेश्वर मिसाळ यांनी जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. मात्र आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्ञानेश्वर मिसाळ यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत

'आम्हाला मेट्रो नको आहे, आम्हाला जगण्याचा मार्ग पाहिजे, मेट्रो मार्गानं पोट भरत नाही. कर्जमाफी म्हणजे नुसती मलमपट्टी वाटते. राज्यातला कास्तकरच संपला तर डिजिटल भारताची भाषा योग्य वाटते काय?, आम्हाला चीन-पाकिस्तानची भीती वाटत नाही, कास्तकरी मरतोय त्याचीच जास्त भीती वाटते. मला या विचारामध्ये जगणे कठीण वाटतंय'

आत्महत्या करणाऱ्या ज्ञानेश्वर मिसाळ यांची कैफियत ऐकल्यानंतर, फडणवीस सरकारला ,मी लाभार्थी, होय हे माझं सरकार' अशी जाहिरातबाजी करण्याचा काय अधिकार आहे?