कोल्हापूर : काँग्रेसला राम राम ठोकून 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' या नव्या पक्षाची स्थापना करणाऱ्या नारायण राणेंनी पक्षाच्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. कोल्हापुरातील जाहीर सभेत नारायण राणे यांच्या हस्ते झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राणेंचे पुत्र माजी खासदार निलेश राणेही उपस्थित होते.


झेंड्यावर भगवा, निळा आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला असून, मध्यभागी वज्रमूठ आहे. नारायण राणेंच्या पक्षाचा झेंडा मनसेच्या झेंड्याशी मिळता-जुळता असल्याची चर्चा आहे.

नारायण राणेंनी कोल्हापूरपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात केली आहे. कोल्हापुरात सभेदरम्यान नारायण राणेंनी नव्या पक्षाच्या नव्या झेंड्याची झलक दाखवली.



अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन पक्षाची वाटचाल सुरु केली आहे. कोल्हापूरची जनता माझ्या स्वभावाशी मिळती-जुळती आहे, असे नारायण राणे यावेळी म्हणाले.

आजपासून 10 डिसेंबरपर्यंत नारायण राणे तीन दिवस सातारा, सांगली आणि कोल्हापूर असा दौरा आहे. नवीन पक्षाची स्थापना झाल्यानंतर आणि एनडीएला पाठिंबा जाहीर केल्यानंतर नारायण राणेंना विधानपरिषदेची उमेदवारी मिळेल अशी आशा होती. पण ती फोल ठरली. त्यामुळे सध्या राणे नवनिर्वाचित पक्षाच्या सक्षम उभारणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं दिसतं आहे. त्याची सुरुवात राणे पश्चिम महाराष्ट्रातून केली आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/939137627026022400