Maharashtra Rain News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. अनेक ठिकाणी पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढचे 3 ते 4 तास महत्वाचे आहेत, कारण, अनेक भागात वादळी वाऱ्याह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 40 ते 50 किमी वेगानं सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तासात राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किमी वेगानं सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं घराबाहेर पाडताना नागरिकांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
'या' भागात जोरदार पावसाचा इशारा
दरम्यान, रत्नागिरीसह पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागात पुढील 3 ते 4 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच गोवा कर्नाटक किनारपट्टी भागातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत राज्याच्या अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.
पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
दापोलीमध्ये आज सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दापोलीत शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तर मागील दोन चार दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे दापोलीतील ग्रामीण भागात शेतीसह पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेरणीनंतर शेतकरी देखील शेतीच्या पुढील कामात गुंतला असून पाऊस नियमित झाल्यामुळे दापोलीतील पर्यटनावरती देखील परिणाम झाला आहे.
मुंबईसह विविध भागात आज पावसाचा यलो अलर्ट
मुंबईसह अनेक भागात पावसाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आलाय. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना आयएमडीने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिय, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Solapar Rain : पावसामुळे बळीराजा सुखावला! नद्या-बंधारे तुडुंब भरले; जून महिन्याच्या आठवडाभरातच पावसाने सरासरी ओलांडली