पंढरपूर : कोरोना काळात अडचणीत आलेल्या महाराष्ट्रातील 48 हजार कलावंतांना महिना पाच हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय घेतलेल्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने आता यात वारकरी संप्रदायाचाही समावेश केला असून वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांनाही पाच हजाराचे मानधन मिळणार आहे. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत बैठक घेतली होती. यात कोरोनाकाळात वारकरी संप्रदायाची दुरावस्था झाल्याचे विठ्ठल पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आणि राज्यातील कलावंतांमध्ये वारकरी संप्रदायाचा समावेश करण्याची मागणी केली.


यास शासनाने सकारात्मक पाठिंबा देत वारकरी संप्रदायातील कीर्तनकार , गायक आणि पखवाजवादक याना यात समावेश करून घेण्याची घोषणा केली. आता राज्य शासनाकडून राज्यातील कीर्तनकार , गायक आणि पखवाजवादक यांचा सर्व्हे करून त्यांना कोरोना काळात पाच हजार रुपयांचे महिना मानधन मिळण्यास सुरुवात होणार आहे. सध्या राज्यात 10 हजारापेक्षा जास्त वारकरी कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक असून या घोषणेमुळे सर्वांना कोरोना काळात महिन्याला पाच हजाराचे मानधनाचा फायदा होऊ शकणार आहे. 


याच सोबत राज्यातील पारंपरिक वारकरी फड प्रमुखाला कायमस्वरूपी मानधन देण्याची घोषणा देखील या बैठकीत करण्यात आली असून संत विद्यापीठासह इतर मागण्या देखील राज्य सरकारने तत्वतः मान्य केल्याचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितले आहे. 


वारकरी संप्रदायासाठी दीर्घकालीन आराखडा
ज्ञानोबा, तुकाराम आणि इतर संत परंपरा, फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारसरणी यामुळे जसे महाराष्ट्राला ओळखले जाते तसेच वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र म्हणूनही एक वेगळी ओळख आहे. या वारकरी संप्रदायासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले होते.  सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील लोककलावंतांना कोविड काळात 5 हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कलाकारांची नोंदणी करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होत असून राज्यातील कलाकार आणि वारकरी संप्रदायवर्गाची नोंद घेण्यात येईल. राज्यातील वृध्द कलावंतांना देण्यात येणाऱ्या मानधनातही वाढ करण्यात येईल.  या निमित्ताने वारकरी संप्रदायाने शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य असून या संप्रदायाकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे. वारकरी संप्रदायाने केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.