सोलापूर : 'मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा आहेत, त्यांचं वक्तव्य गांभीर्याने घेऊ नये', अशी टीका एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली आहे. 48 तासांच्या अल्टिमेटमचं काय झालं? असा सवालही पठाण यांनी विचारला आहे.


'माध्यमांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला प्रसिद्धी देऊ नये. ज्यांना निवडून आलेला एक आमदारही सांभाळता येत नाही त्यांनी उगाच मोठ्या घोषणा करु नयेत', असा हल्लाबोल वारिस पठाण यांनी राज ठाकरेंवर केला.

सोलापुरात पत्रकारांशी बोलताना पठाण यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेवर सडकून टीका केली. 'मराठा आरक्षण जरुर द्या, पण मुस्लिम आरक्षण कधी देणार? न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार जाणूनबुजून मुस्लिम आरक्षण नाकारत
आहे', असंही पठाण म्हणाले.

'सीमेवर जवान शहीद होत आहेत, कुठे आहेत अच्छे दिन आणणारे?' असा प्रश्न विचारत 'थोडे दिवस थांबा आम्ही काय करतो ते पहा' असं वक्तव्यही वारिस पठाण यांनी केलं.