यवतमाळ/वाशिम : कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये मराठा कुणबी समाजाच्या वतीने क्रांती मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आलं. या मोर्चासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील मराठा कुणबी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने पोस्टल मैदानावर
दाखल झाले होते.


दुपारी एक वाजताच्या सुमारास या मोर्चाची शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवात झाली. मात्र सकाळी 9 वाजल्यापासूनच मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने पोस्टल मैदानावर दाखल होत होते. हा मोर्चा पोस्टल मैदान येथून पूनम चौक, हनुमान आखाडा चौक, इंदिरा गांधी मार्केट, पाचकंदील चौक, तहसील चौक, जाजू चौक, दत्त चौक, नेताजी चौक, बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या एलआयसी चौकात एकत्र जमा झाला.

मोर्चा सुरु होताच मुसळधार पाऊस सुरु झाला असतानाही मोर्चेकऱ्यांनी पावसाची तमा न बाळगता मार्गक्रमण शिस्तबद्ध पद्धतीने सुरु ठेवले. यावेळी अनेकांनी शेती पिकाला योग्य भाव मिळाला पाहिजे या मागण्यांचे फलक घेऊन सहभाग नोंदवला. या मोर्चाचा समारोप  एलआयसी चौकात झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांचं  निवेदन दिलं.
वाशिममध्ये मोठ्या जनसमुदायाची उपस्थिती :

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ वाशिममध्ये सकल मराठा क्रांती मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चासाठी वाशिममध्ये मोठा जनसमुदाय स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ दाखल झाला. बाजार समितीतून मन्नासिंग चौक, राजनी चौक, शिवाजी चौक, आंबेडकर चौक मार्गे क्रीडा संकुलावर निवेदन वाचन आणि मोर्चात सहभागी बांधवांची कृतज्ञता व्यक्त झाली. शहीद
जवानांना श्रदांजली अर्पण करुन मोर्चाचं विसर्जन करण्यात येईल.

मराठा मोर्चे कुठे कुठे निघाले?

औरंगाबाद (9 ऑगस्ट), उस्मानाबाद (25 ऑगस्ट), जळगाव (29 ऑगस्ट), बीड (30 ऑगस्ट), परभणी (3 सप्टेंबर), हिंगोली (17 सप्टेंबर), नांदेड (18 सप्टेंबर), जालना (19 सप्टेंबर), अकोला (19 सप्टेंबर), लातूर(19 सप्टेंबर), नवी मुंबई (21 सप्टेंबर) , सोलापूर (21 सप्टेंबर), अहमदनगर (23 सप्टेंबर), नाशिक (24 सप्टेंबर), पुणे (25 सप्टेंबर), वाशिम (25 सप्टेंबर), यवतमाळ (25 सप्टेंबर) .

मराठा मोर्चे कुठे निघणार?

बुलडाणा (26 सप्टेंबर), नंदुरबार (26 सप्टेंबर), सांगली (27 सप्टेंबर), धुळे (28 सप्टेंबर), बारामती (29 सप्टेंबर), सातारा (3 ऑक्टोबर), कोल्हापूर (15 ऑक्टोबर), चिपळूण(रत्नागिरी)(16 ऑक्टोबर), ठाणे (16 ऑक्टोबर) इथे मराठा समाजाचा मोर्चा होणार आहेत.