शासकीय निरीक्षणगृहातच मुलांचं लैंगिक शोषण, दोघांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2016 03:28 PM (IST)
वर्धा: वर्ध्याच्या शासकीय निरीक्षणगृहात काळजीवाहकानंच मुलांचं अनैसर्गिक लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काळजीवाहक आणि निरीक्षणगृह अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे. वर्ध्याच्या शासकीय निरीक्षणगृहाचा काळजीवाहक गणेश राजमलवार मुलांना मारहाण करत त्यांच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य करायचा. गेल्या वर्षी दिवाळीत एका मुलाने याप्रकरणाची वाच्यता निरीक्षणगृहाच्या अधीक्षकांकडे केली होती. मात्र त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं होतं. दरम्यान, एका मुलानं नुकताच या अत्याचारांचा पाढा बालकल्याण समितीपुढे वाचला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी काळजीवाहकासह निरीक्षणगृह अधीक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याप्रकरणाची चौकशीही सुरु करण्यात आली आहे.