वर्धा: सेलू तालुक्यात शेतातील गोठ्याला शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 13 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज सुकळी स्टेशन या ठिकाणी घडली. या दुर्घटनेत शेती साहित्यासह तेथे वास्तव्यास असलेल्या दोन कुटुंबाच्या संसारोपयोगी साहित्याचीही राखरांगोळी झाली. आता त्या कुटुंबांवर उघड्यावर राहण्याची दुर्दैवी वेळ आली.


सुकळी स्टेशन येथील तडस यांची गावालगतच शेती असून त्या शेतात गोठा आहे. तेथे शेतीच्या साहित्यासह जनावरे तसेच दोन शेतमजूरांचा संसार देखील वास्तव्य करीत होता. आज गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शार्ट सर्किटमुळे गोठ्याला अचानक आग लागली. बघता बघता आगीने संपूर्ण गोठ्याला आपल्या कवेत घेतले आणि होत्याचे नव्हते झाले. येथील रहिवासी शेतमजूर मारोती वरठी यांच्या मालकीच्या 19 बकऱ्यांपैकी 13 बकऱ्यांचा यात अक्षरशः कोळसा झाला. इतर जनावरांना मात्र वाचवण्यात यश आले.


आगीने केली संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी
या ठिकाणी लागलेल्या लागलेल्या आगीत  येडमे आणि वरठी यांच्या संपूर्ण संसारोपयोगी साहित्याचीही राखरांगोळी झाली. यात अन्नधान्य, टीव्ही, कुलर, कपाटसह तत्सम साहित्याचा समावेश आहे. शेतमालक तडस यांच्या शेतातील संपूर्ण साहित्य तसेच सिमेंटच्या 30 थैली देखील आगीच्या भक्ष्य ठरल्यात. 


सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी आणि महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड आणि उपनिरीक्षक कंगाले यांनी देखील तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलीस हवालदार नारायण वरठी पंचनामा करीत असून नुकसानीचा आढावा घेत आहेत. सदर दुर्घटनेमुळे मात्र दोन कुटुंबावर उघड्यावर राहण्याची पाळी आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: